जिल्हाकचेरी, जि़प़ परिसर घोषणांनी दुमदुमला
By Admin | Published: June 24, 2014 12:36 AM2014-06-24T00:36:49+5:302014-06-24T00:40:09+5:30
नांदेड : जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद परिसर सोमवारी विविध संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी केलेल्या घोषणांनी दुमदुमला होता़
नांदेड : जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद परिसर सोमवारी विविध संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी केलेल्या घोषणांनी दुमदुमला होता़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील औषध निर्माण अधिकाऱ्यांनी तर जिल्हा परिषदेसमोर राज्य ग्रामसेवक युनियन व ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने आंदोलन केले़
सहाव्या वेतन आयोगात औषध निर्माण अधिकारी संवर्गास केंद्र शासनाच्या संदर्भीय निर्णयानुसार पूर्वलक्षी प्रभावाने प्रारंभिक वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, पदोन्नती सेवा उपलब्ध करून देण्यात याव्यात ३० खाटांच्या ग्रामीण रूग्णालयातील कमी करण्यात आलेल्या औषध निर्माण अधिकारी पदांची पूर्ववत दोन पदे कायम करावी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माण अधिकाऱ्यांचे सेवा प्रवेश नियम अद्ययावत करावे, केंद्र शासनाप्रमाणे ब्रीज कोर्स शासनसेवेत असताना लागू करावा या व अन्य मागण्यांसाठी राज्यभरात औषध निर्माण अधिकारी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे़ या आंदोलनांतर्गत सोमवारी औषध निर्माण अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश देशमुख, कार्याध्यक्ष माधव शिंदे, सरचिटणीस सुनील गादेवार यांनी केले़ या आंदोलनात जिल्हाभरातील सार्वजनिक आरोग्य सेवेतील औषध निर्माण अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता़
जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र शालेय आहार कामगार संघटनेने स्वयंपाकी व मदतनीस यांना कामावरून कमी करू नये या मागणीसाठी आंदोलन सुरू केले़ राज्य शासनाने शालेय पोषण आहार योजनेत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करण्याच्या दृष्टीने बचत गटांकडे नियंत्रणाचे काम २६ फेब्रुवारी २०१४ च्या परिपत्रकानुसार दिले आहे़ त्यात स्वयंपाकी मदतनीसाची निवड संबंधित बचत गटाने करावी असे नमूद केल्याने जुन्या स्वयंपाकी व मदतनीसांवर बेरोजगारीची वेळ आली आहे़ परिणामी त्यांना कामावरून कमी करू नये या मागणीसाठी सोमवारी शालेय आहार कामगार संघटनेचे कॉ़ विजय गाभणे, दिगंबर काळे, धोंडगीर गिरी, शेख फारूख आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनात जिल्हाभरातील महिला स्वयंपाकी व मदतनीसांनी सहभाग घेतला़ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन त्वरीत अदा करावे, वेतन थकविणाऱ्यांवर कारवाई करावी, शासननिर्णयानुसार वेतन आणि राहणीमान भत्ता देण्यात यावा, भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडून नियमित भरणा कराव, ज्येष्ठता यादी अद्ययावत करावी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याबाबत संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना आदेश द्यावे आदी मागण्यांसाठी जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने सोमवारी जिल्हा परिषदेपुढे धरणे आंदोलन केले़ या आंदोलनात कॉ़ बाबाराव जाधव, माधव खानसोळे, हर्षवर्धन आठवले, मगरे, रूक्मीणी लांडगे, बाबाराव जाधव आदींनी सहभाग घेतला़ (प्रतिनिधी)