सलग २८ दिवस नवा रुग्ण, मृत्यू नसेल, तेव्हा जिल्हा कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 02:30 PM2020-11-10T14:30:58+5:302020-11-10T14:32:30+5:30
कोरोनामुक्त जिल्ह्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या घटत असल्याने दिलासा व्यक्त होत आहे. जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्त होण्याकडे सुरू आहे. मात्र, २८ दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळला नाही, एकही मृत्यू झाला नाही, तरच जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो. विद्यमान स्थिती पाहता यासाठी औरंगाबादकरांना मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एप्रिल महिन्यात राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली. प्रामुख्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येवरून ही विभागणी करण्यात आली. ज्या जिल्ह्यात एकही रुग्ण नाही तो जिल्हा ग्रीन झोनमध्ये ठेवण्यात आला, तर १५ पेक्षा कमी रुग्ण आहेत, त्या जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये आहे, तर १५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला. त्यानुसार औरंगाबाद ‘रेड झोन’मध्ये आले. तब्बल ७ महिन्यांनंतर कोरोना संसर्गात औरंगाबाद जिल्ह्याला ऑक्टोबरमध्ये मोठा दिलासा मिळाला. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये ५६ टक्के रुग्ण कमी राहिले.
जिल्ह्यात ३० सप्टेंबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार २११ होती. म्हणजे जिल्ह्यात एकाच वेळी एवढ्या रुग्णांवर उपचार सुरू होते, तर ७ नोव्हेंबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या केवळ ७१२ होती. ऑक्टोबरमध्ये जिल्ह्याची परिस्थिती बदलली आणि रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाली. या महिन्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली. आता केवळ एक हजार सक्रिय रुग्ण राहिले. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाचे संकट अजूनही कायमच; दररोज आढळताहेत रुग्ण
जिल्ह्यात २८ दिवस रुग्ण आढळू नये, एकही मृत्यू होऊ नये, तेव्हाच जिल्हा कोरोनामुक्त घोषित होऊ शकतो, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले; परंतु सध्याची स्थिती पाहता यासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण रोज रुग्ण आढळतच आहेत. मृत्यूही होत आहे.