आदर्श घोटाळ्याच्या चौकशीत जिल्हा उपनिबंधक अधिकाऱ्याला तत्काळ अटक
By सुमित डोळे | Published: August 31, 2023 11:55 AM2023-08-31T11:55:00+5:302023-08-31T11:55:23+5:30
न्यायालयाने सुनांचाही अटकपूर्व जामीन फेटाळला, आरोपी मुलगा सुनील, नामदेव कचकुरेला कारागृहातून पुन्हा ताब्यात घेणार
छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत २०२ काेटींच्या घोटाळ्यात तत्कालीन जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे (५७) याला एसआयटीने बुधवारी सायंकाळी अटक केली. दोन दिवस चौकशीला बोलावून एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तरे न दिल्याने एसआयटीने अखेर त्याला आरोपी करत अटक करण्याचा निर्णय घेतला.
११ जुलै रोजी घोटाळा उघडकीस आल्यानंतर अंबादास मानकापे, त्याचा मुलगा अनिल, संचालक सहकारी, सुना, मुख्य व्यवस्थापक देवीदास आधानेची पत्नीसह १२ आरोपींना अटक करण्यात आली. जवळपास १५० कोटींच्या संपत्तीची माहिती काढण्यात आली. मात्र, सात वर्षे हा घोटाळा होत सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मात्र नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करत होते. एसआयटीचे निरीक्षक संभाजी पवार यांनी दोन दिवसांपूर्वी खरेला चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही.
दिवसभर अनुत्तरित, दिले तेही अपूर्ण
खरेवर दिवसभर एसआयटीने प्रश्नांची सरबत्ती केली. २०१६ ते २०१९ मध्ये पदभार असतानाच त्याच्याकडे पतसंस्थेच्या अनियमित कारभाराविषयी अहवाल सादर झाला होता. मात्र, तो तुम्ही बाजूला का ठेवला, त्याकडे दुर्लक्ष का केले, कारवाई का केली नाही, असे प्रश्न विचारताच खरे शांत झाला. वारंवार प्रश्न विचारूनही असहकार्य करत असल्याने अखेर पोलिसांनी तत्काळ आरोपी करण्याचा निर्णय घेत अटक केली. त्याच्याशी सर्व कचकुरे व सुनील सातत्याने संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आता तिघांची समोरासमोर चौकशीसाठी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघांना पुन्हा गुरुवारी पाेलिस कोठडीत घेतले जाणार आहे. न्यायालयाने बुधवारी पोलिसांची मागणी मान्य केली.
सुनांचा जामीन फेटाळला
आतापर्यंत बाराच्या जवळपास आरोपींना अटक झाली असून त्यातील अनेकांनी आता अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणे सुरू केले आहे. त्यापैकी सून सुनंदा अनिल पाटील (५०) व वनिता सुनील पाटील (४२) यांना जामीन विशेष न्यायालयाने फेटाळल्याचे पवार यांनी सांगितले.
अनेक अधिकारी पसार
खरेला अटक होताच जिल्हा उपनिबंधक कार्यालय हादरले आहे. पहिल्यांदाच एसआयटीने अधिकाऱ्याला अटक केल्याने तत्कालीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अटकेच्या भीतीने वकिलाचा शोधाशोध सुरू केल्याचेही सूत्रांनी सांगितले.