जिल्हा रुग्णालयच ‘आजारी’!
By Admin | Published: June 1, 2017 12:29 AM2017-06-01T00:29:47+5:302017-06-01T00:30:28+5:30
बीड : येथील जिल्हा रुग्णालयात सध्या वर्ग एक व तीनच्या जागा रिक्त आहेत.
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील जिल्हा रुग्णालयात सध्या वर्ग एक व तीनच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे ओपीडीसह अॅडमिट असलेल्या रुग्णांवर उपचार करताना उपलब्ध डॉक्टरांना अडचणी येत आहेत. अनेकवेळा रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. अशा परिस्थितीत डॉक्टर व कर्मचाऱ्यांना नातेवाईकांच्या संतापाला सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात १२ वॉर्ड आहेत. तर ३२० खाट आहेत. प्रत्यक्षात अॅडमिट राहणाऱ्या रुग्णांची संख्या ६०० ते ७०० असते. त्यामुळे खाट अपुरे पडतात. परिणामी रुग्णांना जमिनीवर झोपावे लागते. अनेकवेळा तर खाट उपलब्ध नसल्याने गंभीर आजारातील रुग्णांनाही फरशीवर झोपविण्याची वेळ आली आहे.
तसेच या रुग्णालयात दररोज दोन हजार बाह्य रुग्णांची तपासणी होते. सकाळी सात वाजल्यापासूनच रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण गर्दी करू लागतात. पाहता पाहता रुग्णालय फुल्ल होते. प्रत्येक विभागाच्या समोर रुग्णांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसतात. डॉक्टरही रुग्णांची गर्दी पाहून लवकर लवकर तपासणी करून त्यांना मोकळे करतात. अनेकवेळा गंभीर आजारातील रुग्णांकडेही दुर्लक्ष होते. त्यामुळे रुग्ण संतापून डॉक्टरांसोबत वाद घालत असल्याचे अनुभव रुग्ण सांगतात.
जिल्हा रुग्णालयात वर्गच्या अधिकाऱ्यांची संख्या १९ आहे. परंतु प्रत्यक्षात केवळ चारच कार्यरत आहेत. उर्वरित १५ जागा रिक्त आहेत. या चारपैकी एक जिल्हा शल्य चिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ व त्वचा रोग तज्ज्ञ यांचा समावेश आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोगले हे जुलै महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत तर यातील डॉ.पाटील यांची बदली होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सीए व आरएमओ हे दोन्ही अधिकारी प्रशासकीय कामांमध्येच व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना रुग्ण तपासण्यास वेळ मिळत नाही. रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्याचा भार सध्या वर्ग दोनच्या डॉक्टरांसह नर्सवर असल्याचे सांगण्यात येत आहे.