औरंगाबाद जिल्हा परिषदेत स्थापन होणार ‘वॉर रूम’; आरोग्य समितीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 03:49 PM2018-01-06T15:49:05+5:302018-01-06T15:50:08+5:30
जिल्ह्यात एखादा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास तातडीच्या उपाययोजनांसाठी जि.प. आरोग्य विभागात जिल्हास्तरीय ‘वॉर रूम’ स्थापन करण्याचा निर्णय आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
औरंगाबाद : जिल्ह्यात एखादा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास तातडीच्या उपाययोजनांसाठी जि.प. आरोग्य विभागात जिल्हास्तरीय ‘वॉर रूम’ स्थापन करण्याचा निर्णय आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आरोग्य सभापती मीनाताई शेळके यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विषय समितीची बैठक झाली. या बैठकीत सदस्यांनी जिल्हास्तरीय ‘वॉर रूम’ची गरज व्यक्त केली.
जिल्ह्यात कुठे साथरोग किंवा आरोग्याचा आणीबाणीसारखा प्रसंग उद्भवलाच, तर वॉर रूमच्या माध्यमातून वैद्यकीय अधिका-यांचे पथक तातडीने तिकडे रवाना करता येईल. वेळीच योग्य तो उपचार करता येईल. आरोग्य सभापती हे वॉर रूमचे अध्यक्ष असतील, तर समिती सदस्य हे वॉर रूमचे सदस्य असतील. त्यानुसार या बैठकीत अशा प्रकारचा वॉर रूम स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत ग्रामीण भागातील महिलांसाठी दुर्धर आजारावर मोफत उपचार करण्यासाठी जिल्हा परिषद, एमजीएम आणि गिब्स फाऊंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत सामंजस्य करार झाला आहे. या तीनही संस्थांच्या वतीने तालुकास्तरावर रोगनिदान शिबीर घेऊन गंभीर आजारी महिलांवर एमजीएम हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत, यासंबंधी बैठकीत माहिती देण्यात आली.
आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ग्रामीण भागात जिल्हा परिषदेमार्फत रुग्ण महिलांचा शोध घेतला जाईल. एमजीएम हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार, शस्त्रक्रियाही केल्या जाातील. यासाठी गिब्स फाऊंडेशन ही संस्था आवश्यक निधीचा पुरवठा करणार आहे. यानुसार वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये दर महिन्याला एक याप्रमाणे वषार्तून १२ शिबिरे घेण्यात येतील. या बैठकीत सदस्यांनी आरोग्यसेविकांविषयी अनेक तक्रारी केल्या. आरोग्यसेविका ग्रामीण रुग्णांना योग्य वागणूक देत नाहीत. लसीकरणासाठीही त्या वेळेवर जात नाहीत. महिला-बालकांना ताटकळत बसावे लागते. याकडे जिल्हा आरोग्य विभागाने लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या.