‘समृद्धी’साठी जिल्ह्याला १३०० कोटींची गरज!
By Admin | Published: June 28, 2017 12:43 AM2017-06-28T00:43:41+5:302017-06-28T00:50:49+5:30
औरंगाबाद : समृद्धी महामार्गासाठी संपादित करावयाच्या औरंगाबाद जिल्ह्यातील १६०० हेक्टर जमिनीची दरनिश्चिती आता पूर्णत्वाकडे असून, दि. २९ जून रोजी हा दर जाहीर होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : समृद्धी महामार्गासाठी संपादित करावयाच्या औरंगाबाद जिल्ह्यातील १६०० हेक्टर जमिनीची दरनिश्चिती आता पूर्णत्वाकडे असून, दि. २९ जून रोजी हा दर जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी सुमारे बाराशे ते तेराशे कोटी रुपयांची गरज असेल.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज यासंदर्भात सूतोवाच केले व पत्रकारांशी संवाद साधला. मोबदल्यासंदर्भातही आक्षेप स्वीकारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जिरायती दाखवल्या जात असल्याची तक्रार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली होती. यासंदर्भात नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले की, असा प्रकार झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. मोबदला निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल व मोबदल्याविषयी काही आक्षेप असल्यास तक्रार करता येईल. त्यामुळे बागायती-जिरायतीबाबत शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये.
समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील औरंगाबाद, वैजापूर आणि गंगापूर या तीन तालुक्यांतील १६०० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता दरनिश्चितीही अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी १९५० पासूनच्या जमिनीच्या टायटलची तपासणी केली जात आहे. दरनिश्चिती करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.