जिल्हा नियोजन समिती सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या !
By Admin | Published: February 23, 2016 12:38 AM2016-02-23T00:38:12+5:302016-02-23T00:44:08+5:30
लातूर : जिल्हा नियोजन समितीवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरीने करण्यात येतात. मात्र लातूर जिल्हा नियोजन समितीवर
लातूर : जिल्हा नियोजन समितीवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरीने करण्यात येतात. मात्र लातूर जिल्हा नियोजन समितीवर गेल्या वर्षभरापासून नियुक्त्या रखडल्या आहेत. अशासकीय सदस्यांची मर्यादा १२ असताना १३ जणांची नावे पालकमंत्र्यांकडून दिल्यामुळे राज्य शासनाच्या नियोजन विभागाने सुधारित नावे देण्याचे कळविले आहे.
नवे सरकार आल्यानंतर पूर्वीच्या अशासकीय सदस्यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. सत्ताधारी भाजपा व शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांनी पालकमंत्र्यांकडे नियोजन समितीच्या अशासकीय सदस्यत्वासाठी नावे दिली आहेत. या नावांच्या यादीवर पालकमंत्र्यांची स्वाक्षरीही झालेली आहे. जिल्हा नियोजन समितीत अशासकीय सदस्यांची मर्यादा १२ आहे. परंतु, पालकमंत्र्यांनी दिलेल्या यादीवर १३ जणांची नावे आहेत. या १३ जणांच्या यादीतील एकाचे नाव कमी करावे, अशी सूचना राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून पालकमंत्र्यांना दिली असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषदेतून २४, नागरी भागातून ८ त्यामध्ये लातूर मनपाचे ५ व ३ सदस्य नगरपालिकांतील आहेत. असे एकूण ३२ सदस्य नियोजन समितीवर आहेत. तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदारांचा समावेश या समितीत असतो.
शिवाय, वैज्ञानिक विकास महामंडळाचा शासन नियुक्त सदस्यही या समितीत कार्यरत आहे. याशिवाय १२ अशासकीय सदस्य पालकमंत्र्यांच्या शिफारशीने निवडले जातात. परंतु, गेल्या वर्षभरापासून अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरीमुळे रखडल्या होत्या. आता पालकमंत्र्यांच्या शिफारशीने राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडे अशासकीय सदस्यांची यादी गेली आहे. परंतु, या यादीमध्ये मर्यादेपेक्षा एक नाव जास्त आहे. या यादीतील एक नाव कमी करून फेरयादी पाठवावी, असे राज्य नियोजन विभागाकडून पालकमंत्र्यांना कळविले असल्याचे समजते. (प्रतिनिधी)