जिल्हाध्यक्षांनाच लेखणीबंदचा विसर !
By Admin | Published: April 20, 2016 11:01 PM2016-04-20T23:01:26+5:302016-04-20T23:45:43+5:30
बीड : ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांसाठी झालेल्या आंदोलादरम्यान रोहयोच्या मस्टरवर स्वाक्षऱ्या केल्याने ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण बडे गोत्यात आले आहेत
बीड : ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांसाठी झालेल्या आंदोलादरम्यान रोहयोच्या मस्टरवर स्वाक्षऱ्या केल्याने ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण बडे गोत्यात आले आहेत. त्यांना स्वत:लाच लेखणीबंद आंदोलनाचा विसर कसा पडला? याचीच खमंग चर्चा बुधवारी ग्रामसेवकांत रंगली होती.
‘लेखणीबंदमध्येही दाखवले मजूर’ या मथळयाखाली ‘लोकमत’मध्ये प्रकाशित वृत्ताने नारायण बडे यांनी रोहयो कामांत चऱ्हाटा गावात केलेल्या ‘कर्तव्य’पूर्तीचा नमुना चव्हाट्यावर आला. ग्रामरोजगार सेवकाचा विरोध झुगारुन त्यांनी कामावर मजूर नसतानाही ते मस्टरवरील हजेरीपटावर दाखवले. विशेष म्हणजे ६१ मजुरांच्या नावावर परस्पर मजुरी उचलल्याचेही स्पष्ट झाले आहे. लेखणीबंद आंदोलन असतानाही ग्रामसेवक बडे यांनी मस्टरवर स्वाक्षऱ्या केल्याचे उघड झाल्याने आंदोलन केवळ इतरांसाठी आहे की काय? असा सवाल ग्रामसेवकांतून उपस्थित केला जाऊ लागला आहे. जिल्हाध्यक्षांनी लेखणीबंदमध्ये स्वाक्षरी करुन आंदोलनाची ‘मर्यादा’ भंग केल्याने त्यांच्याबद्दल ग्रामसेवकांतही नाराजीचा सूर आहे. लेखणीबंदचा जिल्हाध्यक्षांनाच विसर पडण्यामागे काय ‘अर्थ’ दडला आहे, हे आता लपून राहिले नाही. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी चऱ्हाट्यातील रोहयो कामांतील अनियमितेला हात घातल्यावर राज्य माहिती आयोगानेही बडे यांना नोटीस धाडून जोरदार दणका दिला. बडे यांचे निलंबन व फौजदारी कारवाईसाठी ढवळे यांच्यासह गावातील नागरिक आक्रमक आहेत. कारवाईशिवाय माघार नाही, असा इशारा दिल्याने बडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा आहे. (प्रतिनिधी)