अनुदानासाठी जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 03:04 PM2019-08-26T15:04:28+5:302019-08-26T15:07:12+5:30
२० वर्षापासून अनुदान मिळण्याच्या आशेवर काम
औरंगाबाद : मागील २० वर्षापासून अनुदान मिळण्याच्या आशेवर काम करत असल्याचे शिक्षकांना अनुदान मंजूर करावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालकांनी कडकडीत बंद पाळला असल्याची माहिती आंदोलक प्रा. मनोज पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तरांची संघटना असलेल्या औरंगाबाद जिल्हा शैक्षणिक व्यासपीठची बैठक माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय परिसरात शुक्रवारी (दि़ २३) पार पडली़ या बैठकीला शिक्षक क्रांतीचे प्रा़ मनोज पाटील, मुख्याध्यापक संघाचे युनूस पटेल, मनोहर सुरगुडे, शिक्षण संस्था महामंडळाचे मिलिंद पाटील, वाल्मिक सुरासे, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे सुभाष मेहर, बिजू मारग, कास्ट्राईबचे देवानंद वानखेडे, अवद चाऊस, प्राथमिक मुख्याध्यापक संघाचे प्रकाश सोनवणे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे प्रदीप विखे, उर्दू शिक्षक संघटनेचे मिर्झा सलीम बेग, शेख मन्सूर, शिक्षक सेनेचे दत्ता पवार, नामदेव सोनवणे, मोहन हाडे, विलास पाटील, उच्च माध्यमिकचे सुनील वाकेकर, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे भारत चाटे यांच्यासह अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते़ या बैठकीत सोमवारी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारी खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळा बंद ठेवण्यात आल्या.
विना अनुदान तत्वावर कार्यरत शिक्षकांना वेतन देण्यासंदर्भात शासनाकडून अनेकदा आश्वासने देण्यात आली़ परंतु, एकही आश्वासनाची पुर्तता शासनाने केली नाही़ लवकरच विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे़ ही आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाने शाळांना अनुदानित घोषित करून विनावेतन शिक्षकांना न्याय मिळवून द्यायला हवा, या मागण्या शिक्षक संघटना, संस्थाचालकांच्या आहेत.3
इंग्रजी शाळांमध्ये काळ्या फिती लावून कामकाज
इंग्रजी शाळा असोशिएशन या संघटनेने शिक्षक, संस्थाचालकांच्या संपाला पाठिंबा देत इंग्रजी शाळांमधील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी दंडाला काळ्या फिती बांधून कामकाजात सहभाग नोंदवला. याला जिल्हाभरातील संघटनांनी प्रतिसाद दिला असल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी प्रल्हाद शिंदे हस्तेकर यांनी दिली.