लाचेत अडकलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेंची ७ वर्षांपासून कारकीर्द वादग्रस्तच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 11:13 IST2025-03-28T11:12:24+5:302025-03-28T11:13:44+5:30
कविता नावंदे राहत असलेल्या अलिशान सोसायटीत घोटाळेबाज हर्षकुमारनेही घेतला होता फ्लॅट

लाचेत अडकलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेंची ७ वर्षांपासून कारकीर्द वादग्रस्तच
छत्रपती संभाजीनगर : स्पर्धेचे देयक काढण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे गुरुवारी रंगेहात पकडल्या गेल्या. परभणी एसीबीने ही कारवाई केली. विशेष म्हणजे, गेल्या आठ वर्षांपासून नावंदे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली असून यापूर्वी त्यांना एकदा निलंबित करण्यात आले होते.
मानवत येथील एका तक्रारदाराला तिथल्या क्रीडा स्पर्धेचे बिल तसेच स्वीमिंग पूलची मान्यता देण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाखांची लाच मागितली होती. त्यातील एक लाख रुपये पहिल्यांदाच त्यांनी स्वीकारले होते. गुरुवारी दुपारी एसीबीने त्यांना उर्वरित रक्कम स्वीकारताना अटक केली. त्यानंतर क्रीडा विभागात खळबळ उडाली. विशेष म्हणजे, डिसेंबरमध्ये शहरात विभागीय क्रीडा संकुलात २१ कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. या घोटाळ्याच्या मास्टरमाईंडने विमानतळासमोरील अलिशान सोसायटीत दीड कोटींचा फ्लॅट खरेदी केला होता. त्याच्या समोरील इमारतीतच नावंदे यांचा फ्लॅट आहे. परभणीत त्यांना अटक होताच एसीबीच्या दुसऱ्या पथकाने त्यांच्या या फ्लॅटमध्ये धाड टाकून संपत्तीची मोजदाद सुरू केली होती.
वादग्रस्त कारवाईची पार्श्वभूमी
-नावंदे २०२०-२०२१ मध्ये शहरातील विभागीय क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा अधिकारी होत्या. व्यायामशाळा साहित्य व क्रीडांगण विकास अनुदान वाटप अनियमिततेप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते.
-चार वर्षांपूर्वी एका सेवानिवृत्त क्रीडा अधिकाऱ्याला विनामोबदला सेवेत सामावून घेतल्याप्रकरणी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी त्यांना नोटीस बजावली होती.
-२०१९ मध्ये अहिल्यानगरमध्ये असताना त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.
-जून, २०२० मध्ये अहिल्यानगरमध्ये कोरोना काळात विनापरवाना प्रवास केल्याप्रकरणी त्यांच्यावर बेलवंडी ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.