जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड निलंबित

By Admin | Published: July 11, 2014 12:10 AM2014-07-11T00:10:08+5:302014-07-11T01:03:41+5:30

हिंगोली : खोट्या शिधापत्रिका तयार करून रेशनचे धान्य वितरीत करून शासनाची व जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांना विभागीय आयुक्तांनी निलंबित केले आहे.

District Supply Officer Abhimanyu Bodhwa suspended | जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड निलंबित

जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड निलंबित

googlenewsNext

हिंगोली : औंढा नागनाथ येथे तहसीलदार पदी कार्यरत असताना खोट्या शिधापत्रिका तयार करून रेशनचे धान्य वितरीत करून शासनाची व जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांना विभागीय आयुक्तांनी निलंबित केले आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा येथे २००८ मध्ये गावातील लोकसंख्या ५५० असताना १ हजार ९ दाखवून खोट्या शिधापत्रिका तयार करण्यात आल्या. गावामध्ये नसणारे व्यक्ती, अविवाहित व्यक्ती, लहान मुले, विद्यार्थी, एकाच कुटुंबातील त्याच- त्या व्यक्तीची नावे, मयत व्यक्ती आदींच्या नावे या शिधापत्रिका तयार करण्यात आल्या. या शिधापत्रिकानुसार रेशनचे धान्य व रॉकेलचे वाटप करण्यात आले. या बाबत येथील ग्रामस्थ विजय विठ्ठलराव थोरात यांनी तक्रार केली होती. त्यामध्ये तलाठी विनोद गादेकर यांनी याद्या तयार केल्या. रेशन दुकानदार ज्ञानोबा सखाराम थोरात यांनी रेशनचे धान्य वाटल्याचे दाखविले.
या याद्यांना तत्कालीन तहसीलदार अभिमन्यू बोधवड व नायब तहसीलदार राजेश लांडगे यांनी संगनमत करून स्वत:च्या फायद्यासाठी पदाचा दुरूपयोग केला व याद्यांना मंजुरी दिली. यामुळे शासनाची व जनतेची फसवणूक झाली, असेही तक्रारीत म्हटले होते. या बाबत १५ फेब्रुवारी २०१४ रोजी पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याने तक्रारदार विजय थोरात यांनी औंढा येथील न्यायालयात धाव घेतली.
त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन तहसीलदार अभिमन्यू बोधवड, नायब तहसीलदार राजेश लांडगे, तलाठी विनोद गादेकर व रेशन दुकानदार ज्ञानोबा थोरात या चौघांवर कळमनुरी येथील पोलिस ठाण्यात ५ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना तात्पुरता जामिनही मिळाला होता. हे प्रकरण राज्य शासनाकडे आल्यामुळे विभागीय आयुक्त संजिव जयस्वाल यांनी तत्कालीन तहसीलदार व सध्या जिल्हा पुरवठा अधिकारीपदी कार्यरत असलेले अभिमन्यू बोधवड यांना शासनाची व जनतेची फसवणूक करून कर्तव्यात कसून केल्याने व शासकीय कामात त्यांच्या पदाशी, कर्तव्याशी नितांत सचोटी ठेवली नसल्याने त्यांना निलंबित केल्याचे आदेश ९ जुलै रोजी काढले. हे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयास १० जुलै रोजी पाप्त झाले.
या आदेशात बोधवड यांचा पदभार विशेष भूसंपादन अधिकारी बी. एल. गिरी यांच्याकडे देण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)
न्यायालयाने अटकपुर्व जामिन फेटाळला
या प्रकरणातील चारही आरोपींना यापुर्वी तात्पुरता जामिन मिळाला होता. गुरूवारी या प्रकरणी अटकपुर्व जामिनासाठी आरोपींच्या वतीने अर्ज करण्यात आल्यानंतर वसमत येथील न्यायालयाने अर्ज फेटाळला असल्याची माहिती अ‍ॅड. हरिष मुरक्या यांनी दिली. त्यामुळे चारही आरोपींच्या अडचणी वाढल्या आहेत.
औंढा तालुक्यातील गढाळा येथील प्रकरण
औंढा नागनाथ येथे तहसीलदारपदी कार्यरत असताना बोधवड यांनी गढाळा येथील लोकसंख्या ५५० असताना १ हजार ९ रेशनकार्डना दिली होती मंजुरी.
लहान मुले, विद्यार्थी, अविवाहित व्यक्ती, मयत व्यक्ती, इतर गावांमधील व्यक्ती आदींच्या नावे देण्यात आले होते रेशनकार्ड.
बनावट रेशनकार्डवर रेशन दुकानदारांकडून धान्य व रॉकेलचे वितरण करण्यात आले असल्याची तक्रार.
औंढा नागनाथ येथील न्यायालयाने आदेश दिल्यानंतर बोधवड यांच्यासह चार जणांवर कळमनुरी पोलिसांत दाखल झाला होता गुन्हा.
गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने चारही आरोपींना तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज केला होता मंजुर.
काही दिवसांपुर्वीच बोधवड यांची जालना येथे बदली झाल्यानंतर त्यांनी मॅटमध्ये धाव घेवून बदलीला मिळविली होती स्थगिती.
विभागीय आयुक्तांनी बोधवड यांना जालना येथे रुजू होण्याचे दिले होते आदेश.

Web Title: District Supply Officer Abhimanyu Bodhwa suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.