जिल्हा शल्यचिकित्सकांना ‘ओपीडी’ सुरु करणे नडले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 06:12 PM2018-03-22T18:12:56+5:302018-03-22T18:15:28+5:30
कालबाह्य औषधी प्रकरणाबरोबर मिनी घाटी म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे दसर्याच्या मुहूर्तावर केलेले पूजन, कोणत्याही राजकीय समारंभाशिवाय बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा प्रयत्न यासह इतर अनेक बाबी जिल्हा शल्यचिकित्सांना नडल्याची चर्चा आरोग्य विभागात सुरू आहे.
औरंगाबाद : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांना शनिवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. कालबाह्य औषधी प्रकरणाबरोबर मिनी घाटी म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे दसर्याच्या मुहूर्तावर केलेले पूजन, कोणत्याही राजकीय समारंभाशिवाय बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा प्रयत्न यासह इतर अनेक बाबी जिल्हा शल्यचिकित्सांना नडल्याची चर्चा आरोग्य विभागात सुरू आहे.
सामान्य रुग्णालयाच्या उद््घाटनाची नुसती प्रतीक्षा करावी लागत असताना आॅक्टोबरमध्ये उद््घाटनाआधीच दसर्याचा मुहूर्त साधून रिकाम्या वास्तूचे पूजन करण्यात आले. यावेळी मंत्रिमहोदयांच्या तारखेची जुळवाजुळव केली जात असताना उद््घाटनाआधीच रुग्णालयाच्या इमारतीचे पूजन उरकण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी १० आॅक्टोबरपूर्वी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याची तयारी केली. त्यासाठी नाशिक कुंभमेळ्यासाठी घेतलेल्या खाटा रुग्णालयात सज्ज करण्यात आल्या; परंतु कोणत्याही राजकीय समारंभाशिवाय बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा प्रयत्न आरोग्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून थांबविला. या ठिकाणी केवळ बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याऐवजी रीतसर उद््घाटन करून सर्व सेवा एकदाच सुरू केल्या जातील, असे म्हणून आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकार्यांचे तोंड बंद केले.
लाखो रुपये खर्चून सामान्य रुग्णालयाची भव्य इमारत बांधण्यात आली; परंतु या रुग्णालयाचा डोलारा जुनाट आणि गंजलेल्या साहित्यावर उभा केला जात होता. नवीन साहित्य मिळण्यास विलंब होत असल्याने ठिकठिकाणांहून साहित्याची जुळवाजुळव करण्यात आली. रुग्णालय सुरू करण्यासाठी धडपड होत असली तरी हा प्रकार वरिष्ठ पातळीवर खटकला. यामुळे शासनाची नाचक्की होत होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच २०० नव्या खाटांची आॅर्डर देण्यात आली असून, जुने साहित्य परत पाठविण्याची सूचना करण्यात आली. या सगळ्या प्रकरणांमुळे निलंबनाच्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ जिल्हा शल्यचिकित्सांवर आल्याची चर्चा आरोग्य विभागात सुरू आहे.
भोसले यांच्याकडे पदभार
डॉ. जी. एम. गायकवाड यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईनंतर जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा प्रभारी पदभार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. व्ही. भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे.