जिल्हा रुग्णालयातील ‘लिफ्ट’चे ग्रहण सुटेना...!
By Admin | Published: September 28, 2014 12:29 AM2014-09-28T00:29:42+5:302014-09-28T00:41:19+5:30
उस्मानाबाद : साथरोगासह इतर गंभीर आजाराचे शेकडो रूग्ण जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असतानाही येथील स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष होत आहे़
उस्मानाबाद : साथरोगासह इतर गंभीर आजाराचे शेकडो रूग्ण जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असतानाही येथील स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष होत आहे़ शिवाय गत अनेक वर्षापासून प्रथम क्रमांकाची लिफ्ट बंद असल्याने एकाच लिफ्टवर रूग्णांसह अधिकाऱ्यांना रूग्णालयाचे मजले चढ-उतार करावे लागत आहेत़
जिल्हा रूग्णालय सध्या रूग्णांनी पूर्णत: भरले आहे़ बाह्य रूग्ण विभागात दररोज १००० ते १३०० पर्यंत रूग्ण तपासणीसाठी येतात़ शहरासाह परिसरातील ग्रामीण भागातील रूग्णांची संख्या यात मोठी आहे़ तर जिल्ह्याच्या विविध भागातील रूग्णही येथे येतात़ सध्या साथरोगांचा फैलाव असून, अबालवृध्दांना याची मोठी लागण झाली आहे़
एकीकडे जिल्हा रूग्णालयातील बेड कमी पडत असल्याने जमिनीवर रूग्णांना उपचार घ्यावे लागत आहेत़ अनेक रूग्ण असाध्य आजाराने पीडित असून, त्यांना तिसऱ्या मजल्यावरून तळमजल्यावर येण्यासाठी एकाच लिफ्टचा आधार घ्यावा लागत आहे़ गत अनेक वर्षापासून पहिली लिफ्ट बंद अवस्थेत आहे़ यामुळे रूग्णांची हेळसांड कायम असताना जिल्हा रूग्णालयातील स्वच्छतेकडेही दुर्लक्ष कायम आहे़ दोन वेळेस साफसफाई केली जात असल्याचे सांगितले जात असले तरी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह रूग्णांच्या नातेवाईकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे़ (प्रतिनिधी)
जिल्हा रूग्णालयातील पहिली लिफ्ट सुरू करण्यासाठी संबंधित विभागाने दोन-तीन वेळा दुरूस्ती केली़ मात्र, जुन्या पध्दतीची ही लिफ्ट काही दिवसातच परत बंद पडत आहे़ त्यामुळे चालू असलेल्या लिफ्टला काही अडचण आली तर बंद लिफ्टचे साहित्य काढून लावण्यात येत आहे़ त्यामुळे ही लिफ्ट सुरू होण्याची शक्यता कमी आहे़
कचऱ्याचे डबे गायब
४जिल्हा रूग्णालयातील तळमजल्यापासून दुसऱ्या मजल्यापर्यंत ठिकठिकाणी पायऱ्यांच्या कोपऱ्यात घाण होवू नये म्हणून कचरा टाकण्यासाठी प्लॅस्टिकचे डबे ठेवण्यात आले होते़ मात्र, हे डबे गायब झाले आहेत़