फोडणीसोबतच देवासमोरील दिवाही महागला; खाद्यतेलात लीटरमागे १० रुपये भाववाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 02:34 PM2021-08-04T14:34:23+5:302021-08-04T14:39:03+5:30

ऐन श्रावणाच्या तोंडावर खाद्यतेलात वाढ झाल्याने मध्यमवर्गीयांची चिंता वाढली आहे.

Diva in front of God became expensive along with the Tadka; Rs 10 per liter hike in edible oil | फोडणीसोबतच देवासमोरील दिवाही महागला; खाद्यतेलात लीटरमागे १० रुपये भाववाढ

फोडणीसोबतच देवासमोरील दिवाही महागला; खाद्यतेलात लीटरमागे १० रुपये भाववाढ

googlenewsNext
ठळक मुद्देसणासुदीच्या दिवासात महागाई आणखी किती बेलगाम होईल हे सांगणे कठीण आहे.दुकानात फलकावरील तेलाचे भाव पाहून ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहेत.

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : सोयाबीन व पामतेलात (खाद्यतेल) १० रुपये वाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला. भाजीची फोडणीच नव्हे तर देवासमोर दिवा लावताना आता गृहिणी हात आखडता घेत आहेत.सध्या पामतेल १३० रुपये तर सोयाबीन तेल १५० रुपये प्रतिलीटर विकत आहे. सोयाबीन तेलाचे भाव पहिल्यांदा शेंगदाणा तेलाच्या बरोबरीला आले आहेत.

ऐन श्रावणाच्या तोंडावर खाद्यतेलात वाढ झाल्याने मध्यमवर्गीयांची चिंता वाढली आहे. पुढे ऐन सणासुदीच्या दिवासात महागाई आणखी किती बेलगाम होईल हे सांगणे कठीण आहे. यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट बिघडले आहे. दुकानात फलकावरील तेलाचे भाव पाहून ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहेत. देशात सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे. काही दिवसांपूर्वी लातूर येथे सोयाबीनला ९ हजार रुपयांचा तर मध्य प्रदेशातील मंदसौर येथील पिपलियामंडीत प्रतिक्विटलला १२ हजार रुपयांचा भाव मिळाला. याचा परिणाम, सोयाबीन तेलाचे भाव वाढण्यावर झाला. पामतेल उत्पादक देश मलेशियामध्ये सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. यामुळे तेथून पामतेलाची आयात होण्यास उशीर लागत असल्याने त्याचा परिणाम पामतेलाच्या भाववाढीवर झाल्याचे होलसेल व्यापाऱ्यांनी सांगितले.

आणखी भाववाढीचे संकेत
महाराष्ट्रात सोयाबीनचे भाव ९ हजार रुपये क्विंटलवर जाऊन पोहोचले आहेत. सोयाबीन महागल्याने खाद्यतेलात भाववाढ होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास येत्या दिवसात सोयाबीनमध्ये आणखी भाववाढ होऊ शकते. पामतेलही महागते आहे. यामुळे मागील सहा महिन्यात ३० टक्के ग्राहकांनी खाद्यतेल खरेदी कमी केली आहे. याचा फटका विक्रेत्यांना बसत आहे.
- जगन्नाथ बसय्ये, विक्रेते

सणासुदीत महागाई वाढतेच
सरकार कोणतेही असो, सणासुदीच्या तोंडावर महागाई वाढतेच. आताही त्याची प्रचिती येत आहे. खाद्यतेलात तर मागील वर्षभरापासून भाववाढ होत आहे. तसेही मागील ३ वर्षांपासून डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे आम्ही खाद्यतेल वापरणे निम्म्याने कमी केले आहे.
- नीता खडके, गृहिणी, शिवाजीनगर


खाद्यतेल             १ जुलै (प्रतिलीटर)             ३० जुलै
पामतेल             १२० रु.                         १३० रु.
सोयाबीन तेल १४० रु.                         १५० रु.
सरकी तेल             १४५ रु.                         १४५ रु.
सूर्यफूल तेल १६० रु.                         १६० रु.
शेंगदाणा तेल १६० रु.                         १६० रु.
करडी तेल            २०५ रु.                         २०५ रु.

Web Title: Diva in front of God became expensive along with the Tadka; Rs 10 per liter hike in edible oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.