महावितरणकडून धोकादायक तारांचे जाळे
By Admin | Published: August 11, 2014 12:00 AM2014-08-11T00:00:49+5:302014-08-11T00:04:13+5:30
जालना : घरगुती वीज जोडणी करताना महावितरणने अनेक ठिकाणी नियमबाह्य जोडणी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
जालना : घरगुती वीज जोडणी करताना महावितरणने अनेक ठिकाणी नियमबाह्य जोडणी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे जोडणीसाठीची संपूर्ण रक्कम घेऊन त्यासाठी खांबांऐवजी अक्षरश: लाकडी काड्यांचा उपयोग करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी विद्युत तारा रस्त्यावर लोंबकळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या जिविताला हानी बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून वीज कंत्राटदारांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न होत आहे.
घरगुती वीज जोडणीसाठी १६०० ते २१०० रुपये आणि व्यावसायिक वीज जोडणीसाठी २६०० रुपये शुल्क आकारले जाणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात घरगुतीसाठी ३ ते ४५०० रुपये आणि व्यावसायिकसाठी ५ ते ६ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. विशेष म्हणजे जोडणीसाठी वायर आणि केबल महावितरणकडूनच मिळणे आवश्यक आहे. मात्र ऐनवेळी लाईनमनमार्फत ‘सध्या आमच्याकडे केबल नाही, केबल बाहेरून आणावे लागेल. वायरही उपलब्ध नाही, वायर कमी आहे’ अशी कारणे सांगून त्यासाठीचे पैसे स्वतंत्र मागितले जातात.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे खाजगीकरणाद्वारे कंपनीत रूपांतर झाल्यानंतर जिल्हा पातळीवर वीज जोडणीच्या कामासाठीही टेंडर काढले जाते. ज्या एजन्सीला जोडणीचे काम दिले, त्या एजन्सीमार्फतच हे काम होण्याऐवजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांमार्फतच ही कामे केली जातात. त्यामुळे खांबांच्या वापराऐवजी चक्क लाकडी काड्यांचा वापर करण्यात येत असल्याचा प्रकार अनेक ठिकाणी झालेला आहे.
जुना जालन्यातील योगेश्वरी कॉलनी भागात लोकांच्या जिविताला हानी होईल, अशाप्रकारे जोडणीसाठी वायर टाकण्यात आलेले आहेत. शास्त्री मोहल्ला भागात वायर आणि विद्युत ताराही लोंबकळत आहे. नूतन वसाहत, भाजीमंडई परिसर, संजयनगर, नीळकंठ कॉलनी, दु:खीनगर, देहेडकरवाडी परिसर, काद्राबाद परिसर, रामनगर, गांधीनगर, कन्हैय्यानगर, अलंकार परिसर, रेल्वेस्टेशन रोड परिसर, मंठा रोड परिसर इत्यादी भागात लोंबकळणारे वायर, विद्युत तारा आढळतात.
हे सर्व प्रकार सुरू असताना महावितरणचे स्थानिक अधिकारी मात्र त्याकडे डोळेझाक करून कंत्राटदारांना पाठिशी घालण्याचा प्रकार करत असल्याने सर्वसामान्य लोकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे अशाप्रकारे नियमबाह्य कामे होत असताना दुसरीकडे सर्वसामान्य वीज ग्राहकांना नाहक त्रास देण्याचे प्रकारही होत आहेत.
वीज दुरूस्तीसंबंधीचे अनेक अर्ज महावितरणकडे दाखल झालेले आहेत. मात्र त्यामध्ये मोजक्या ग्राहकांकडेच दुरूस्ती झालेली आहे. अनेक अर्ज अद्यापही पडून असल्याचे समजते.
ग्राहकांनी याबाबत विचारणा केल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे बोट दाखविण्याचा नवा फंडाच सुरू झालेला आहे. (प्रतिनिधी)