ईश्वर भक्ती सुख-शांतीचा मार्ग
By Admin | Published: February 28, 2017 12:45 AM2017-02-28T00:45:35+5:302017-02-28T00:47:01+5:30
लातूर येथे दोन दिवसीय जिल्हास्तरीय ‘इज्तेमा’ला सोमवारी प्रारंभ झाला
लातूर : ईश्वर भक्ती ही सुख-शांती आणि समृद्धीचा मार्ग आहे. कुरआनमध्ये ईश्वराने केलेल्या मार्गदर्शनानुसार आचरण केले तर सुखी जीवनाचा मार्ग सापडतो़ कुरआन आणि हदिसमध्ये समस्त मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग दाखविला आहे़ त्यासाठी कुरआन व हदीसचे समजून वाचन केले तर त्यातील संदेश कळतो़ त्यानुसार जगण्याचा प्रयत्न केला तर जीवनात शांती आणि समृद्धी प्राप्त होते, असा उपदेश नांदेड येथील मौलाना सादसाब यांनी येथे केला़
लातूर येथे दोन दिवसीय जिल्हास्तरीय ‘इज्तेमा’ला सोमवारी प्रारंभ झाला. दुपारच्या सत्रात उपदेश करताना मौलाना सादसाब म्हणाले, पाच वेळेची नमाज पठण करणे अनिवार्य आहे़ नमाज चांगल्या मार्गाकडे घेऊन जाते़ यातून मनाला शांती आणि जीवनाला दिशा मिळते़ सायंकाळच्या सुमारास औरंगाबाद येथील मौलाना युसूफभाई म्हणाले, पैगंबर हजरत मुहम्मद (सल्ल़) यांचे जीवन सबंध मानव जातीसाठी आदर्श आहे़ ते कुरआनच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगले़ पैगम्बरांनी अल्लाहचा प्रत्येक संदेश मानवापर्यंत पोहोचविला आहे़ त्यासाठी वाचनाची व ते समजण्याची गरज असून, त्यानुसार आचरण करणे महत्वाचे आहे़ तरच जीवनात यशस्वी होता येईल, असेही मौलाना युसूफभाई म्हणाले़ इज्तेमासाठी जिल्हाभरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़