दिव्य शिवोत्सव! पंधरा हजार पणत्यांनी साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 06:48 PM2023-11-08T18:48:25+5:302023-11-08T18:49:41+5:30

१५ हजार पणत्या अवघ्या २२ मिनिटांत पेटविण्यात आल्या

Divine Shiv festival! The image of Chhatrapati Shivaji Maharaj was created by 15 thousand great grandchildren | दिव्य शिवोत्सव! पंधरा हजार पणत्यांनी साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

दिव्य शिवोत्सव! पंधरा हजार पणत्यांनी साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

पैठण: डोळे दिपवून टाकणारे व्यक्तिमत्व असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा १५ हजार पणत्या प्रज्वलित करून साकारण्याची किमया शहरात साध्य झाली. आर्य चाणक्य विद्या मंदिर शाळेच्यावतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दोन एकर क्षेत्रात ही प्रतिमा साकारण्यात आली. त्यानंतर ३५० गगनभेदी रंगीबेरंगी फटाके वाजवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षवेधी प्रतिमेस सलामी देण्यात आली. हे विहंगम दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक शाळेच्या मैदानावर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकास ३५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आर्य चाणक्य विद्या मंदिर शाळेच्यावतीने दुर्ग भ्रमंती नंतर मंगळवारी  दिव्याच्या माध्यमातून छत्रपतींची प्रतिमा साकारली. यावेळी ५४ किलो फुले, ४५ किलो रांगोळीच्या सहायाने "दिव्य शिवोत्सव व राजमुद्राही " साकारण्यात आली होती. छत्रपतींची प्रतिमा साकारण्यासाठी १५ हजार पणत्या, १०५ लिटर तेल, ३० हजार वाती, ५४ किलो फुले, ४५ किलो रांगोळी व ८×१६ चा भगवा ध्वज आदी साहित्य लागले, असे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांनी सांगितले.

१५ हजार पणत्या अवघ्या २२ मिनिटांत पेटविण्यात आल्या
जसजसे पणत्या पेटत होत्या तसतशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस आकार येत होता. हे पाहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने परिसर दणाणून जात होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुगलकिशोर लोहिया, मार्गदर्शक म्हणून डॉ. जयंत जोशी, प्रमुख पाहुणे म्हणून  महेश चन्ने, डॉ. पद्मकुमार कासलीवाल, विजय चाटुपळे, शिवाजी मारवाडी, नंदकिशोर मालाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

दिव्य शिवोत्सव कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सतिष आहेर, सुदाम पोल्हारे, विकास देशमुख, सर्फराज अंबेकर, गणेश माळवदकर, मनोज शिंगारे, प्रियंका निकाळजे, राखी धोकटे, गीतांजली शेवतेकर आदी शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, रिक्षा चालक-मालक, स्वयंसेवक विद्यार्थी यांनी  परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन विलास खर्डेकर व शिखा शाह यांनी केले.

Web Title: Divine Shiv festival! The image of Chhatrapati Shivaji Maharaj was created by 15 thousand great grandchildren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.