जिल्हा वाहतूक शाखेचे विभाजन
By Admin | Published: August 12, 2015 12:46 AM2015-08-12T00:46:43+5:302015-08-12T00:57:39+5:30
जालना : शहरासह जिल्ह्यातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वाहतूक शाखेचा तीन उपविभागांत विभाजन करण्याचा निर्णय घेतला असून,
जालना : शहरासह जिल्ह्यातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वाहतूक शाखेचा तीन उपविभागांत विभाजन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र अगोदरच वाहतूक शाखेत मान्यतेच्या ५० टक्केच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात विभाजन करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची वानवा निर्माण होणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे.
जालना शहरासह जिल्ह्यातील तालुकास्थानी असलेल्या शहरात दिवसेंदिवस वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. जालना शहरात तर दररोज वाहतुकीचा प्रश्न भेडसावत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी मागील आठवड्यात वाहतूक शाखेचा तीन विभागांत विभाजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार जालना, परतूर, अंबड-भोकरदन या उपविभागात विभाजन करण्यात आले.
जिल्हा वाहतूक शाखेची जबाबदारी पोलीस निरीक्षक शेवगण यांच्यावर देण्यात आली. हे तिन्ही विभाग कार्यरत करण्यात आल्याने परतूर उपविभागासाठी पोलिस निरीक्षक शेवगण यांच्याकडे अतिरिक्त भार देण्यात आला. पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्याकडे अंबड- भोकरदन उपविभागाचा पदभार देण्यात आला. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिष पाटील यांच्याकडे परतूर व जालन्याचा पदभार देण्यात आला. यातील पोलीस निरीक्षक राऊत यांनी पदभार घेतला आहे. मात्र सपोनि पाटील यांनी अद्यापपर्यंत वाहतूक शाखेच्या उपविभागाचा पदभार घेतला नसल्याचे समजते.
वाहतूक शाखेच्या तीनही उपविभागात त्या- त्या ठाण्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात येणार आहे. शिवाय पोलिस प्रशिक्षण झालेले ४७ कर्मचारी आहेत. ते सध्या नाशिक येथील कुंभमेळाव्यास बंदोबस्तासाठी आहे. ते तेथून परतल्यास त्यातील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्याही वाहतूक शाखेत करण्यात येणार आहे. वाहतूक शाखेत पुरेसे मनुष्यबळ देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
जालन्यातील वाहतूक शाखेला ६० कर्मचारी संख्या मंजूर आहे. मात्र प्रत्यक्षात ३९ कर्मचारीच वाहतूक शाखेला देण्यात आले. त्यात पोालिस निरीक्षक दोन, उपनिरीक्षक ६, हे. कॉ. १०, नायक पो. कॉ १०, महिला कॉ ६ , पो.कॉ ५ या प्रमाणे मनुष्यबळ आहेत. शहरात वाहतुक शाखेचे बस स्थानक, वीर सावरकर चौक, पाणीवेस, जर्नादन मामा चौक, मुथा बिल्डींग, शनिमंदिर, अंबड चौफुली असे सुमारे ३० पॉइंट आहेत.