गर्दी टाळण्यासाठी सिल्लोड शहरात लसीकरण केंद्राचे विभाजन - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:02 AM2021-05-12T04:02:07+5:302021-05-12T04:02:07+5:30
सिल्लोड : उपजिल्हा रुग्णालयात लस घेण्यासाठी गर्दी होत असल्याने महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी अचानक येथे भेट देऊन ...
सिल्लोड : उपजिल्हा रुग्णालयात लस घेण्यासाठी गर्दी होत असल्याने महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी अचानक येथे भेट देऊन संबंधित अधिकारी यंत्रणेला फटकारले. लस घेण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी केंद्राचे वर्गीकरण करा, असे आदेश दिले. त्यामुळे आता उपजिल्हा रुग्णालयाऐवजी शहरातील छत्रपती शाहू महाराज मंगल कार्यालय व मौलाना आझाद सामाजिक सभागृह येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मंगळवारपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या ठिकाणी महिला व पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था असेल.
राज्यमंत्री सत्तार यांनी दिलेल्या अचानक भेटीदरम्यान उपजिल्हा रुग्णालयात अस्वच्छता दिसून आली. त्यामळे त्यांनी संतप्त होत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका, येथील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या, अशा सूचना केल्या. उपजिल्हा रुग्णालयात किमान ५ व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करणे, रुग्णालयातील बेड्स व बेडशीटची साफसफाई ठेवणे. वापरलेल्या बायोमेडिकलची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, यासाठी नगर परिषदेने एक स्वतंत्र युनिट उभारणे गरजेचे आहे. यासंबंधी नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्वरित प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या. तिसऱ्या लाटेचा सामना करताना तज्ज्ञांनी लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे सुचवले आहे. त्या पद्धतीने नियोजन करून शहरातील बालरोगतज्ज्ञांची बैठक घ्यावी, असे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.