विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड ३१ मे रोजी होणार निवृत्त; मुदतवाढ मिळणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 03:40 PM2024-05-23T15:40:53+5:302024-05-23T15:41:28+5:30
विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांना निवृत्ती नंतर छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून संधी मिळण्याची अपेक्षा असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.
छत्रपती संभाजीनगर : विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. मुदतवाढ मिळावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. यामुळे आर्दड यांना मुदतवाढ मिळणार की नवीन अधिकारी विभागीय आयुक्त पदी नियुक्त होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांना निवृत्ती नंतर छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून संधी मिळण्याची अपेक्षा असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे, परंतु मुख्य सचिव वगळता कुणालाही मुदतवाढ मिळत नाही. तशी पद्धत शासनात नाही, असे सूत्रांनी सांगितले. यासोबत शुक्रवारी विभागीय आयुक्तपदी कोण येणार, याचे नाव निश्चित होईल. पुढच्या आठवड्यात आदेश निघतील. महिला अधिकाऱ्यास राजकीय वर्तुळातून विरोध असल्यामुळे कुणाची वर्णी लागते, याकडे लक्ष आहे.
जुलै २०२३ मध्ये स्वीकारला होता पदभार
मधुकरराजे आर्दड यांचे मूळ गाव हे जालना जिल्ह्यातील राजाटाकळी हे आहे. त्यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यात विविध पदांवर काम केले आहे. जुलै २०२३ मध्ये सुनील केंद्रकर यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारल्यामुळे विभागीय आयुक्त पद रिक्त झाले होते. या रिक्त झालेल्या जागेवर मधुकरराजे आर्दड यांची शासनाने १७ जुलै २०२३ रोजी नियुक्तीचे आदेश काढले. ते त्यावेळी छत्रपती संभाजीनगर येथेच मृद व जल संधारण आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्याच दिवशी पदभार देखील स्वीकारला होता.