थरारक! घोणसच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 07:10 PM2022-03-07T19:10:28+5:302022-03-07T19:11:37+5:30

विषारी सापामुळे ‘गुलशन महल’मध्ये धावपळ

Divisional Commissioner Sunil Kendrakar rescued from the snake attack | थरारक! घोणसच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

थरारक! घोणसच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

googlenewsNext

औरंगाबाद : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या गुलशन महल या शासकीय निवासस्थानी शनिवारी रात्री घोणस जातीचा सुमारे साडेसहा फूट विषारी साप आढळल्याने आयुक्तांसह कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. आयुक्त केंद्रेकर आणि सर्पमित्राने मोठ्या शिताफीने तो साप पकडला.

निवासस्थानातील कुत्र्याने भुंकून सावध केल्यामुळे तो साप पकडता आला. त्याला पकडण्यासाठी असलेली स्टीक गुळगुळीत असल्यामुळे साप त्यातून निसटला. आयुक्तांची समयसूचकता थोडी मागे-पुढे झाली असती तर त्यांना सापाने दंश केला असता. साप एवढे फूत्कार मारत होता की, त्याच्या हल्ल्यामुळे स्टीकला विष लागले होते.गुलशन महलमध्ये साप निघण्याची ही दुसरी घटना असून गेल्यावर्षीही आयुक्तांनी कुठलीही सुरक्षासाधने न वापरता विषारी साप पकडला होता.

साप निघताच निवासस्थानातील शिपाई व कर्मचारी पळाले. स्टीकने साप पकडताच त्याने स्टीकला झटका देत आयुक्तांवर झडप मारण्याचा प्रयत्न केला. साप घरात शिरण्याचा प्रयत्न करत असल्याने आयुक्तांनी पुन्हा त्याला पकडले, त्यातूनही सुटून त्याने आयुक्तांच्या दिशेने झेप घेतली. त्यानंतर तो एका कोपऱ्यात दडून बसला. मग आयुक्तांनी सर्पमित्र मनोज गायकवाड यांना फोन करून बोलावले. त्यांच्याकडे वेगळा चिमटा होता, त्यामुळे त्याला पकडता आले. त्यानंतर आयुक्तांसह सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

तर जिवाला होता धोका
केंद्रेकर निवासस्थानाच्या आवारात फेरफटका मारत असताना रात्री अकराच्या सुमारास कुत्रा वारंवार भुंकू लागल्यामुळे आयुक्तांचे तिकडे लक्ष गेले.
घोणस या सापाला पाहून कुत्रा भुंकत होता. आयुक्तांनी ताबडतोब निवासस्थानातून चिमटा आणून घोणस पकडण्याचा प्रयत्न केला. कुत्र्यामुळे साप अतिशय खवळल्यामुळे तो फूत्कार मारीत होता. आयुक्तांनी चिमट्याने सापाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून सुटून सापाने आयुक्तांच्या अंगावर दोन वेळेस हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घोणस ५ ते ७ फूट लांब उडी मारतो. त्यामुळे त्याला पकडण्यात थोडीही हलगर्जी झाली असती तर आयुक्तांच्या जिवाला धोका होता.

सापाची विविध नावांनी ओळख
घोणस सापाला वेगवेगळ्या राज्यांमध्ये २ ते ३ नावाने ओळखतात. घोणस, परड, सोन्या परड अशी त्याची नावे आहेत. इंग्लिशमध्ये या सापाला (रसेल व्हायपर) असे नाव आहे. त्या सापाला जंगलात साेडण्यात आले.

Web Title: Divisional Commissioner Sunil Kendrakar rescued from the snake attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.