सहमतीने घेतला घटस्फोट; आता पत्नी व मेव्हणीची करतोय सोशल मीडियावरून बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 12:16 PM2021-06-11T12:16:19+5:302021-06-11T12:17:46+5:30
रांजणगाव परिसरातील २६ वर्षीय महिला व तिच्या पतीने वादामुळे सहमतीने घटस्फोट घेतला.
वाळूज महानगर ( औरंगाबाद ) : घटस्फोटित पत्नी व मेव्हणीची सोशल मीडियावरून बदनामी करणाऱ्या आरोपीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.
रांजणगाव परिसरातील २६ वर्षीय महिला व तिच्या पतीने वादामुळे सहमतीने घटस्फोट घेतला. फारकत घेतल्यानंतर ही महिला दोन मुलांसह रांजणगावात वास्तव्यास आहे. तीन महिन्यांपूर्वी १५ मार्चला आरोपी पंजाब शिवानंद थोरवे (रा. शिरपूर, जि. बुलडाणा, ह.मु. रांजणगाव परिसर) याने त्याच्या सोनू थोरवे या फेसबुक व व्हॉटस्ॲप अकाउंटवरून घटस्फोटित पत्नीचा फोटो, अश्लील मजकूर, टाकत तिचा मोबाइल नंबरही टाकून तिची बदनामी सुरू केली. यानंतर आरोपीने ९ जूनला घटस्फोटित पत्नीच्या लहान बहिणीचाही अशाच पद्धतीने सोशल मीडियावर फोटो, अश्लील संदेश व तिचा मोबाइल नंबर टाकून बदनामी सुरू केली होती.
बदनामीनंतर पोलीस ठाण्यात तक्रार
सोशल मीडियावर या दोघा बहिणींची बदनामी केल्याचा प्रकार लक्षात येताच पीडित घटस्फोटितेने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी पंजाब थोरवेविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार हे करीत आहेत.