१० डिसेंबरला होणार दिव्यांग रन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 01:31 AM2017-11-23T01:31:35+5:302017-11-23T01:31:43+5:30
नवजीवन संस्थेतर्फे अपंग दिनाचे औचित्य साधत १० डिसेंबर रोजी दिव्यांग रनचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व वयोगटांतील दिव्यांग तसेच सामान्य व्यक्तीदेखील सहभागी होऊ शकतात, अशी माहिती या संस्थेच्या विश्वस्त शर्मिला गांधी यांनी दिली.
औरंगाबाद : नवजीवन संस्थेतर्फे अपंग दिनाचे औचित्य साधत १० डिसेंबर रोजी दिव्यांग रनचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व वयोगटांतील दिव्यांग तसेच सामान्य व्यक्तीदेखील सहभागी होऊ शकतात, अशी माहिती या संस्थेच्या विश्वस्त शर्मिला गांधी यांनी दिली. ही दिव्यंग रन साडेतीन कि.मी. अंतराची असणार आहे. त्यास सरस्वती भुवनपासून सकाळी ६ वाजता प्रारंभ होईल. तसेच स.भु., निराला बाजार, सतीश मोटर्स, क्रांतीचौक, पैठणगेट, गुलमंडी, बलवंत वाचनालय व समारोप स.भु. येथेच होणार आहे. एका दिव्यांग खेळाडूसोबत एक नॉर्मल व्यक्तीदेखील असेल. तसेच ज्याला पळता येईल त्यांनी पळावे, ज्यांना व्हीलचेअरवर बसून सहभागी व्हायचे असेल त्यांनाही यात सहभागी होता येईल, असे त्यांनी सांगितले.
नवजीवन संस्था ही गत ३२ वर्षांपासून शहरात मतिमंदांच्या क्षेत्रात सर्वांगीण पुनर्वसनासाठी कार्यरत असल्याचेही शर्मिला गांधी यांनी सांगितले. दिव्यांग रनमध्ये जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नवजीन संस्थेच्या अध्यक्षा नलिनी शाह, सचिव रामदास आंबुलगेकर, विश्वस्त शर्मिला गांधी यांनी केले आहे.