दहावी-बारावीच्या दिव्यांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:05 AM2021-02-25T04:05:36+5:302021-02-25T04:05:36+5:30
--- पालकांना चिंता : कोरोनामुळे सराव नाही, बैठक व्यवस्थेच्या निर्बंधाची भीती --- औरंगाबाद : दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर ...
---
पालकांना चिंता : कोरोनामुळे सराव नाही, बैठक व्यवस्थेच्या निर्बंधाची भीती
---
औरंगाबाद : दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. मात्र, अद्याप लेखनिक मिळवण्यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे आपला लेखनिक कोण असेल, हे माहीत नसल्याने त्यासोबतचा परीक्षापूर्वीचा सराव होऊ शकलेला नाही. कोरोनामुळे बैठक व्यवस्थेच्या निर्बंधांमुळे दिव्यांगांना लेखनिक देण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
एक गट खालचा विद्यार्थी ही अट प्रमुख असल्याने त्या विद्यार्थ्याकडून पेपर लिहिला जाईल का, लेखानिक निश्चित नसल्याने त्यांच्यासोबत सराव, ट्युनिंग जुळणे आदी प्रश्न दिव्यांग विद्यार्थ्यांसह पालकांना सतावत आहेत. जिल्ह्यात दहावीचे ६५ हजार ११, तर बारावीचे ५५ हजार १७१ परीक्षार्थी परीक्षेला बसले आहेत. त्यापैकी दहावी बोर्डाच्या परीक्षेत २८३, तर बारावीच्या परीक्षेत २८३ विद्यार्थी दिव्यांग आहेत.
प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना व पालकांना परीक्षेत मिळणाऱ्या सुविधांबद्दल पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया शाळेनेच राबवली पाहिजे. पालकांची फरफट व्हायला नको. लवकर लेखनिक निश्चित झाला तर त्याच्यासोबत लिहिण्या-बोलण्याचा सराव होऊन परीक्षेवेळी गोंधळ होणार नाही, असे प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांनी सांगितले.
---
दिव्यांग परीक्षार्थी
---
बारावी-२५१
दहावी -२८३
---
पालक काय म्हणतात....
---
दहावीला नववीचा, तर बारावीला दहावी-अकरावीचा विद्यार्थी लेखनिक म्हणून बसवावा लागतो. राज्य मंडळ एक गट खालचा लेखनिक या अटीला अडून बसते. त्या विद्यार्थ्यांना लेखनाचा तेवढा सराव नसतो. कोरोनामुळे अशा विद्यार्थ्यांसोबत सराव, पूर्वतयारी नसेल तर अडचणी येतात. ही अट शिथिल व्हावी.
- अदिती शार्दुल, संचालिका, विहंग शाळा
---
सराव नसेल तर परीक्षार्थी आणि लेखानिकाची ट्युनिंग जुळण्यात अडचण येते. सध्या प्रमाणपत्र मिळवण्यातही अनेक अडचणी येत आहेत. त्यात लेखनिकाबद्दल अद्याप शाळांकडून अर्ज मागवलेले नाही. त्यामुळे लेखनिक नक्की न केल्यास सराव कोणासोबत करावा, हा प्रश्नच आहे.
- संदीप पगारे, दिव्यांग विद्यार्थी पालक
--
सवय असलेल्या लेखनिकाला दिले जावे. याची व्यवस्था शाळांकडून व्हावी. शाळांना वर्गशिक्षकांना माहिती देण्याची गरज पडू नये. परीक्षकांना दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुविधांसंदर्भात संपूर्ण माहिती असावी, जेणेकरून त्यांची ऐन परीक्षेवेळी अडवणूक होणार नाही.
- संभाजी पाटील, दिव्यांग विद्यार्थी पालक
- दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार वाढीव वेळ किंवा लेखनिकाची सुविधा दिव्यांगांना दिली जाते. त्यासंबंधीची अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. पालकांच्या मागणीनुसार लेखनिक दिले जातात.
- सुगता पुन्ने, सचिव, विभागीय परीक्षा मंडळ