छत्रपती संभाजीनगरात कन्नौज अत्तराचे दर्दी; जागोजागी सुगंधी कट्टे
By प्रशांत तेलवाडकर | Published: April 10, 2024 11:19 AM2024-04-10T11:19:44+5:302024-04-10T11:20:01+5:30
अजूनही अत्तर गल्लीत गेले की, पहिले कापसावर अत्तराचा थेंब टाकून (फाया) ग्राहकाला दिला जातो.
छत्रपती संभाजीनगर : सिटी चौकातील निजामकालीन अत्तर गल्लीत सुगंध दरवळतच आहे, पण आता शहरात जागोजागी सुगंधी कट्टे तयार झाले आहेत. वर्षभर अत्तर, स्प्रे विक्री होत असली तरी रमजान ईदमध्ये सुगंधी दरवळ जास्तच असते. मन प्रफुल्लित करणारे हे सुगंधी कट्टे आता शहराची नवीन ओळख बनले आहेत.
रमजान ईद अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मुस्लीम बांधव खरेदीच्या सर्वांत शेवटच्या टप्प्यात अत्तर आवर्जून खरेदी करतात. प्रत्येक जण न विसरता अत्तराची कुप्पी खरेदी करतोच. यामुळे रमजान ईदमध्ये सर्वाधिक अत्तर, स्प्रेची विक्री होत असते. अत्तराचे दर्दीसुद्धा शहरात अजून कायम आहेत. यामुळे अत्तर बाजारात बोटावर मोजण्याइतके सुगंधी कट्टे असले तरी दर्दींपर्यंत त्याचा सुगंध जाऊन पोहोचतोच. अत्तर गल्लीशिवाय शहरवासीयांना पर्याय नव्हता, पण मागील २० वर्षांत शहरातील प्रमुख बाजारपेठेत चौकात जागोजागी सुगंधी कट्टे निर्माण झाले आहेत. याशिवाय काही जण कार्यालयात, घरोघरी फिरूनही अत्तराची विक्री करीत आहेत. यामुळे अत्तर गल्लीचे महत्त्व कमी झाले आहे. नवीन पिढी आता अत्तरापेक्षा विविध कंपन्यांच्या स्प्रेला पसंती देत असल्याने सुगंधी कट्ट्यांना पसंती दिली जात आहे.
फाया देऊन स्वागत
अजूनही अत्तर गल्लीत गेले की, पहिले कापसावर अत्तराचा थेंब टाकून (फाया) ग्राहकाला दिला जातो. स्वागताची ही परंपरा अजूनही कायम आहे. यामुळेच ही निजामकालीन सुगंधी गल्ली मराठवाड्यात प्रसिद्ध आहे.
कन्नौज अत्तराचे दर्दी
शहरात अत्तराचे दर्दी काही कमी नाहीत. ते सुगंधावरून अत्तर असली की कृत्रिम आहे हे ओळखतात. त्यातल्या त्यात उत्तर प्रदेशातील कन्नौज येथील अत्तर खरेदी करणारा एक खास वर्ग आहे. यामुळे अत्तर है कन्नौजच्या नावाने विकले जाते, अशी माहिती अत्तर विक्रेत्यांनी दिली.