सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची दिवाळी संपेना; कार्यालयात १०.३० वाजेपर्यंत सन्नाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 01:38 PM2020-11-24T13:38:14+5:302020-11-24T13:41:31+5:30
मनपा, जिल्हाधिकारी कार्यालयात तुरळक, तर जि.प.त सर्वाधिक उपस्थिती
औरंगाबाद : दिवाळीच्या सुट्या संपून आठवडा उलटला. मात्र, अद्याप सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा दिवाळी फिवर संपलेला नाही. लोकमत टीमने जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा आणि जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी १०.३० पूर्वी किती कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते, याची पाहणी केली. त्यात जिल्हाधिकारी व मनपा कार्यालयात ७० टक्के अधिकारी, कर्मचारी कार्यालयात आले नव्हते. तर जिल्हा परिषदेत ९० टक्के कर्मचारी उपस्थित होते.
सध्या कोरोनाचा कहर कमी झाल्याने प्रलंबित कामासाठी दिवाळीच्या सुटीनंतर नागरिक कार्यालयांच्या चकरा मारत आहेत. त्यात अधिकारी-कर्मचारी दिवाळीच्या मूडमधून बाहेर आले नसल्याने अभ्यागतांच्या खेट्या सुरूच आहेत. नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी कर्मचारी, अधिकाऱ्यांची मुख्यालयातील उपस्थिती गरजेची असल्याचे मत जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी, अधिकाऱ्यांची उपस्थिती कर्मचारी मात्र तुरळक
सकाळी १० वाजता : जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासनमध्ये २ जण सफाई करीत होते, तर १ कर्मचारी कामात होते. महसूलमध्ये १ लिपिक, रोहयोत एक पोलीस, तीन कर्मचारी, गृहविभागात १ कर्मचारी, पुरवठा विभागात २ लिपिक, १ कर्मचारी, भूसंपादनमध्ये ४ जण उपस्थित होते.
मनपात निम्म्याहून अधिक गायब
सकाळी १०.२० वाजता : मनपाच्या आरोग्य विभागात पीसीपीएनडीटी विभागात दोन कर्मचारी तर दोन कर्मचारी बाहेर बसलेले होते. लेखा विभागात चार जण, वित्त विभागात दोन कर्मचारी पाच लिपिक, नगरसचिव दालनात ३ जण तर आयुक्त दालनात सर्व कर्मचारी उपस्थित होते. तर एकही वरिष्ठ अधिकारी मुख्य प्रशासकीय इमारतीत दिसले नाही.
जिल्हा परिषदेत बहुतांश कर्मचारी हजर
सकाळी १० : ४० वाजता : आरोग्य विभाग, वाॅर रूम, सामान्य प्रशासन विभागात कर्मचारी, अधिकारी हजर होते. पशुसंवर्धन, कृषी, शिक्षण, सिंचन विभागात अधिकाऱ्यासह कर्मचारी उपस्थित दिसून आले. वित्त विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक सुरू होती. बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता, अभियंते हजर होते. तर निम्मे अधिक कर्मचारी मात्र, दिसून आले नाहीत.