दिवाळी फक्त दिव्यांची, पर्यावरणासाठी बहुली ग्रामस्थांनी एकमताने फटाके ठेवले दूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 12:44 PM2023-11-16T12:44:37+5:302023-11-16T12:47:39+5:30
बहुलीत सात वर्षांपासून साजरी होते फटाकेमुक्त दिवाळी
सिल्लोड : तालुक्यातील आदर्श व पर्यावरण ग्राम असलेले बहुली येथे गत सात वर्षांपासून फटाकेमुक्त, पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली दिवाळी साजरी केली जात आहे. यंदाही गावात एकही फटाका फुटला नाही.
दिवाळी म्हटली की, फटाके व ओघाने ध्वनी, वायू व जल-भू प्रदूषण आलेच. देशात दरवर्षी सुमारे ५ हजार कोटी रुपयांचे फटाके फोडले जातात व त्यातून खूप मोठे प्रदूषण होते. सिल्लोड तालुक्यातच यावर्षी सुमारे एक ते दीड कोटी रुपयांच्या फटाक्यांची विक्री झाली. गावागावांत फटाक्यांचे आवाज घुमत असताना, या अनिष्ट प्रथा, परंपरांना तिलांजली देत बहुली गावात एकही फटाका न फोडता दिवाळी साजरी केली जात आहे. हे गाव गत सात वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी एकत्रित प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे दिवाळीच नव्हे, तर लग्न वा इतर समारंभातही फटाके फोडले जात नाहीत.
सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व पर्यावरण संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी गावाला यासाठी प्रेरित केले आहे. गावात दिवाळीत कसलेही ध्वनी, वायू, जल प्रदूषण होत नाही. बहुलीत विविध पर्यावरणस्नेही उपक्रम पाटील यांनी आजवर राबविले आहेत. गावात मोर व हरणांची संख्या मोठी आहे. या वन्यजीवांसह येथील जैवविविधतेला वाचविण्यासाठी ग्रामस्थ एकत्रितपणे प्रयत्न करत असल्याचे डॉ. संतोष पाटील यांनी सांगितले.
सर्व गावाची एकजूट आहे
फटाके न फोडल्यामुळे आमच्या गावाचे दरवर्षी दीड लाख रुपये वाचतात. या वाचविलेल्या पैशांतून ग्रामस्थ मुलांसाठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी करतात. गावात ७ वर्षांपासून दिवाळीत कसलीही अनुचित घटना घडलेली नाही.
- भाऊसाहेब पा. निकोत, ग्रामस्थ, बहुली.