बाजारात दिवाळी; १७ दिवसांत दीड हजार कोटींची उलाढाल अपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 01:03 PM2020-10-28T13:03:23+5:302020-10-28T13:13:25+5:30
यंदा दसरा सण शेवटच्या आठवड्यात आला. तरीपण बाजारात ५०० कोटींची उलाढाल झाली.
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : कंपन्या कामगारांना बोनस जाहीर करीत आहेत. यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात कोरोनामुळे खबरदारी घेत सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी ग्राहकांनी ऐनवेळी खरेदी करणे टाळत आतापासूनच कपड्यासह अन्य खरेदीला सुरुवात केली आहे. आगामी १७, दिवसांत बाजारपेठेत दीड हजार कोटींची उलाढाल होईल, अशी शक्यता जिल्हा व्यापारी महासंघाने व्यक्त केली आहे.
यंदा दसरा सण शेवटच्या आठवड्यात आला. तरीपण बाजारात ५०० कोटींची उलाढाल झाली. आता पुढील महिन्यात दिवाळी १४ नोव्हेंबर रोजी (लक्ष्मीपूजन) साजरी करण्यात येणार आहे. पगार व बोनस एकदाच मिळणार असल्याने बाजारात खरेदीला उधाण येणार आहे. यंदा गर्दी टाळण्यासाठी ग्राहक दसऱ्यापासूनच दिवाळी खरेदीला लागले आहेत. जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, पुढील १७ दिवसांत शहरात सर्व बाजारपेठ मिळून दीड हजार कोटींची उलाढाल होईल. या अंदाजाने सर्व व्यापाऱ्यांनी तयारी केली आहे.
अजय तलरेजा यांनी सांगितले की, सध्या लहान मुलांचे ड्रेस, तरुणींचे ड्रेस व महिला साड्या खरेदीसाठी कापड बाजारात येत आहेत. दिवाळीपर्यंत कापड बाजारात २०० कोटी रुपयांची उलढाल अपेक्षित आहे. किराणा जनरल मर्चंट असोसिएशनचे संजय कांकरिया यांनी सांगितले की, जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात आहेत. किराणा व्यवसायात जवळपास ७० कोटींची उलाढाल होईल. याशिवाय इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रॉनिक्स बाजार, मोबाईल, लॅपटॉप, सोने, फर्निचर, रंग, आदी व्यवसायांतही चांगली उलाढाल होण्याची चिन्हे आहेत.
बहुतांश कंपन्या ५ तारखेपर्यंत देणार बोनस
बजाज ऑटो कंपनीने बोनस जाहीर केला. बहुतांश कंपन्यांनी येत्या ५ नोहेंबरपर्यंत बोनस जाहीर करण्याची तयारी केल्याची माहिती औद्योगिक वर्तुळातून मिळाली. औरंगाबाद वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, शेंद्रा या औद्योगिक वसाहतीत ४ हजारच्या जवळपास कंपन्या आहेत. त्यात दीड लाखापेक्षा अधिक कामगार काम करतात. बजाज कंपनी प्रत्येकी २५ हजारांनुसार ५ हजार कामगारांना बोनस वाटप करणार आहे. उर्वरित बहुतांश कंपन्यांचा बोनसही ५ ते १० तारखेपर्यंत कामगारांच्या हाती येईल. यामुळे शहरात मोठी उलाढाल होणार आहे.
मागील बोनसचे १०० कोटी
गेल्या वर्षी जिल्ह्यातील विविध कंपन्या मिळून १०० कोटींहून अधिक रुपयांचे बोनस कामगारांना वाटप केले होते. यंदाही किमान तेवढेच बोनस दिले जाण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात हा पैसा कामगाराच्या हातात पडू शकेल.
- मुकुंद कुलकर्णी, मराठवाडा अध्यक्ष, सीआयआय
६ हजार वाहने विक्रीचे उद्दिष्ट
वाहन बाजारात सर्व वितरक मिळून येत्या १७ दिवसांत १ हजार चारचाकी वाहने व ५ हजार दुचाकी विक्रीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात १५० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
- राहुल पगारिया, अध्यक्ष, चेंबर ऑफ ऑथोराईज ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन