आली दिवाळी; बाजार फुलला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:38 AM2017-10-16T00:38:40+5:302017-10-16T00:38:40+5:30
अवघ्या दोन दिवसांवर आलेला दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी उत्साह दिसून येत आहे. यामुळे बीडच्या बाजारपेठेला ‘अच्छे दिन’ आले असून, बाजार फुलला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : यावर्षी पावसाने ब-यापैकी हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र आनंदी वातावरण आहे. अवघ्या दोन दिवसांवर आलेला दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी उत्साह दिसून येत आहे. यामुळे बीडच्या बाजारपेठेला ‘अच्छे दिन’ आले असून, बाजार फुलला आहे.
या सणाच्या निमित्ताने सर्वत्र आनंदी वातावरण असते. घराघरात पणत्यांच्या उजेडाने आनंद आणखी द्विगुणित होतो. दिवाळी सणाची खरेदी करण्यासाठी बीडच्या बाजारपेठेत सर्वत्र गर्दी दिसत आहे. शनिवारी रात्री पावसाने हजेरी लावली असली तरी रविवारी सूर्यदर्शन झाल्याने सकाळी १० वाजल्यापासूनच सुभाष रोड, माळीवेस, कारंजा, भाजी मंडई, स्टेडियम कॉम्प्लेक्स आदी ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी दिसून आली. छोट्या-मोठ्या हातगाड्यांसह मोठमोठी दुकाने गि-हाईकांच्या गर्दीने फुलले आहेत.
दिवाळीनिमित्त अंगण सजविण्यासाठी विविधरंगी रांगोळ्यांची मागणी असते. यंदा १० टनापेक्षा जास्त रांगोळी बीडमध्ये आली असून, किरकोळ विक्रेत्यांचे हातगाडे शहरातील बाजारपेठेसह विविध भागांत लागले आहेत. त्याचबरोबर पूजा साहित्याला वाढती मागणी असून, सुगंधित लक्झरी अगरबत्तीच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. २४ तास, ४० तास वातावरण सुंगधित करणारी उदबत्तीेदेखील आकर्षण ठरत आहे.
लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक असणारे अत्तर, तसेच विविध फ्लेवरचे स्प्रे, डिओची खरेदीही ग्राहक करीत आहेत. आकाशकंदिल, आकर्षक नक्षीकाम असलेल्या विविध आकारातील पणत्या बाजारात उपलब्ध असून, चौकशी करून ग्राहक खरेदी करीत आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलीस विभाग व व्यापा-यांनी समन्वय राखून उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी येणा-या ग्राहकांच्या वाहनांसाठी लगत परिसरातील मोकळी जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून दिल्यास वाहनकोंडी होणार नाही, अशी सूचनाही नागरिकांनी केली आहे.