गरीबांची दिवाळी केली कडू, गोदामातील साखर आता लागले वाटू
By | Published: December 2, 2020 04:10 AM2020-12-02T04:10:55+5:302020-12-02T04:10:55+5:30
बाजारसावंगी : शासनाने गरिबांची दिवाळी गोड व्हावी, याकरिता २० रुपये किलो दराने साखर उपलब्ध करून दिली होती. मात्र, तालुका ...
बाजारसावंगी : शासनाने गरिबांची दिवाळी गोड व्हावी, याकरिता २० रुपये किलो दराने साखर उपलब्ध करून दिली होती. मात्र, तालुका पुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे गरिबांना दिवाळीत साखरेचा एक कणही वाटप न करता, ही साखर गोडाऊनमध्येच साठवून ठेवली. गरिबांची दिवाळी कडू केल्यानंतर आता ही साखर शिधापत्रिकाधारकांना वाटप करायला काढली आहे. तिची किंमतही आता २० ऐवजी २५ रुपये करण्यात आली आहे. पुरवठा विभागाच्या वरातीमागून घोडे दामटण्याच्या या कृतीचा नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
बाजारसावंगी, दरेगाव, पाडळी, लोणी, बोडखा, कनकशीळ, रेल, धामणगाव, ताजनापूर, येसगाव, झरी येथील स्वस्त धान्य दुकानांत गरीब शिधापत्रिकाधारकांना दिवाळीत साखर मिळाली नाही. याव्यतिरिक्त त्यांना निकृष्ट दर्जाचा गहू, तांदूळ, तसेच मका वाटप केला. मका नको म्हटले तरी तो बळजबरीने ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. तक्रार करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते, तसेच दखलही घेतली जात नसल्याने कोणीही तक्रारीच्या फंदात पडत नाही. दिवाळीच्या वेळी साखर वाटपाचे आदेश असताना, पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे ही साखर गोडाऊनमध्येच राहिली. दिवाळीनंतर आता साखर वाटपाचे नाटक वठविले जात आहे. शिधापत्रिकाधारकांवर अन्याय केला असल्याचे अशोक नलावडे यांनी सांगितले
चौकट
कुबट वास येणार किडलेला गहू, मका
शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांमधून किडलेला व कुबट वास येणारा गहू तसेच मका वाटप केला जात आहे. गरिबांना पर्याय नसल्याने ते हे निकृष्ट धान्य घेऊन जात आहेत. जनावरांना खाण्यायोग्य मका गरिबांना वाटप केला जात असून, त्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे अशोक नलावडे या नागरिकाने सांगितले.
चौकट
पुरवठा अधिकाऱ्यांचा नो प्रतिसाद
तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी प्रत्येक स्वस्त धान्य दुकानांना भेट देऊन तेथे तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, कोणत्याही दुकानांना भेट न देता त्यांचे दप्तर तहसील कार्यालयात बोलावून सर्व आलबेल असल्याचे प्रमाणपत्र ते देतात. प्रशासनाच्या कृपाशीर्वादामुळे स्वस्त धान्य दुकानमालकांचे फावत आहे. याबाबतीत तालुका पुरवठा अधिकारी उदय मानवतकर यांच्याशी भ्रमणध्वणीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.