चोरांची दिवाळी ! औरंगाबादेत २४ तासांत तब्बल १३ घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 12:28 PM2021-11-09T12:28:14+5:302021-11-09T12:29:18+5:30
चोरट्यांनी दिवाळीच्या सुटी दरम्यान आठवड्यात १७ घरे फोडली असल्याचे पुढे आले आहे
औरंगाबाद : शहरातील विविध भागात मागील २४ तासांत १३ घरे फोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मागील आठ दिवसांत हा आकडा १७ वर पोहोचला असून, या चोरीच्या घटनेतील एकही आरोपी पकडण्यात शहर पोलिसांना यश मिळालेले नाही.
दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी शहरातील अनेक कुटुंबे गावाकडे गेली होती. या काळात गारखेडा परिसर, किलेअर्क, सिडको, बीड बायपास या भागात चोरांनी घरे फोडली आहेत. रविवारी रात्री वानखेडेनगर, एन १३ भागात आणखी पाच घरे फोडून चोरांनी पोलिसांनी झोप उडवली. पुंडलिकनगरमध्ये एकाच रात्री पाच घरे फोडल्याची घटना रविवारी समोर आली. वानखेडेनगर येथील एकाच गल्लीमध्ये समोरासमोरील पाच घरे फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. संदीप सुहास साळुंके हे बाहेरगावी गेले होते. चोराने घर फोडत दहा हजारांची रोकड लांबवली. त्यांच्याच शेजारी राहत असलेले दीपक श्रीचंद पवार हे व त्यांची पत्नी बाहेरगावी गेले होते. चोराने त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून १४ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, चेन, लॉकेट, पैंडल, अंगठी व इतर असे पावणेतीन लाखांचे दागिने लंपास केले. याशिवाय गजानन गिरनारे यांचे घर फोडून पाच ग्रॅमचे कानातले, तीन ग्रॅमचे मणी असे आठ ग्रॅमचे दागिने लांबविले. मयूर संदीप देवकर यांच्या घरातुन मुद्देमाल लंपास करण्यात आलेला नाही. याशिवाय एक घर रिकामेच होते. त्यातूनही काही चोरीला गेलेले नाही. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले.
श्वान, ठसेतज्ज्ञांना पाचारण
बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी केली. यानंतर श्वानपथकासह ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वान काही अंतरापर्यंत जाऊन घुटमळला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हींची पाहणी केली. घटनास्थळी पोलीस उपायुक्त अपर्णा गिते, सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ यांनीही पाहणी केली.
तक्रार देण्यास नकार
वानखेडेनगरात फोडलेल्या पाच घरांपैकी तीन जण तक्रार करण्यासाठी पुढे आले. उर्वरित दोघांनी नकार दिला. याशिवाय पुंडलिकनगर हद्दीतही पाच घरफोडीच्या घटनांपैकी केवळ एकच जण तक्रारीसाठी पुढे आला. इतर ठिकाणीही अनेक जण घरे फोडल्यानंतरही तक्रार देण्यास पुढे येत नसल्याची माहिती आहे.
गुन्हेगार मोकाट
दिवाळीच्या पूर्वी शहर पोलिसांनी ‘आपला शेजारी खरा पहारेकरी’ हे अभियान राबविले होते. यानंतरही चोऱ्या होत आहेत. सर्व चोरटे मोकाट आहेत. यामुळे गुन्हे शाखेसह पोलीस ठाण्यांतील विशेष पथके कोणती कामे करीत आहेत. यावर शंका उपस्थित होत आहे.