नाडी जलद होऊन चक्कर, असू शकतो 'कार्डियाक अरेस्ट'; 'हा' उपाय केला तर वाचेल जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 01:53 PM2023-07-10T13:53:31+5:302023-07-10T13:54:15+5:30
प्रत्येक वेळी हार्ट अटॅकच नसतो; दुर्लक्ष करणे पडेल महागात; अशा वेळी ‘सीपीआर’ने ५० टक्के रुग्णांना वाचविणे शक्य
छत्रपती संभाजीनगर : नाडी अचानक जलद होते आणि व्यक्ती कोसळते. ही परिस्थिती ‘सडन कार्डियाक डेथ’कडे नेणारी ठरू शकते. मात्र, रुग्णाला वेळीच ‘कार्डियो पल्मोनरी रिसॅसिटेशन’ म्हणजेच ‘सीपीआर’ दिल्यास त्याचा जीव वाचण्याची शक्यता वाढते. ‘सीपीआर’मुळे जवळपास ४० ते ५० टक्के रुग्णांचा जीव वाचतो. त्यामुळे प्रत्येकाने ‘सीपीआर’ क्रिया शिकली पाहिजे, असे तज्ज्ञांनी म्हटले.
शहरात शनिवारी आणि रविवारी ‘सडन कार्डियाक डेथ’ या विषयावर परिषद पार पडली. या परिषदेत रविवारी तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. मुंबई येथील डाॅ. आशिष नाबर म्हणाले, अनेकदा रुग्णाला हृदयाचा आजार आहे, हेच माहीत नसते. नाडी अचानक जलद होते आणि व्यक्ती कोसळतो, याला ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ म्हणतात. हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला, हृदय कमकुवत असणाऱ्यांनी याबाबत वेळीच निदान करून घेतले पाहिजे. पूर्वी हार्ट अटॅक येऊन गेलेल्या रुग्णांसोबत असे होते. तेव्हा दुसऱ्यांदा हार्ट अटॅक आला, असे म्हटले जाते. परंतु, प्रत्येक वेळीच हार्ट अटॅक आलेला असतो, असे नाही.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी डाॅ. विनोद गोसावी, डाॅ. गीता फेरवाणी, डाॅ. अमरजा नागरे, डाॅ. रंजित पालकर, डाॅ. सचिन मुखेडकर, डाॅ. श्रीकांत देशपांडे, डाॅ. शरद बिरादार यांनी ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ आणि ‘ॲडव्हान्स कार्डियाक लाईफ सपोर्ट’वर मार्गदर्शन केले आणि प्रशिक्षण दिले.
श्वास, शुद्ध, नाडी नसेल तर...
पुणे येथील डाॅ. राजेश धोपेश्वरकर म्हणाले, प्राण वाचविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सीपीआर शिकले पाहिजे. श्वास, शुद्ध आणि नाडी लागत नसेल तर रुग्णाला सीपीआर दिले पाहिजे. मुंबई येथील डाॅ. सौरभ देशपांडे म्हणाले, रुग्णाला ‘सीपीआर’ दिल्याचा फायदा होतो. प्रत्येक रुग्णाला वेळीच रुग्णालयात पोहोचविले पाहिजे.
पोलिसांना ‘सीपीआर’चे प्रशिक्षण
हृदयरोगतज्ज्ञ डाॅ. अजित भागवत म्हणाले, परिषदेच्या पहिल्या दिवशी शनिवारी १२० पोलिसांना ‘सीपीआर’चे प्रशिक्षण देण्यात आले. यापुढेही विविध ठिकाणी ‘सीपीआर’चे प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येणार आहे. या परिषदेत जवळफास १४० तज्ज्ञांनी सहभाग नोंदविला.