सिग्नलवर डीजेचे वाहन पेटले; कर्ज काढून व्यवसाय सुरू केलेल्या तरुणाचे ३५ लाखांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 12:14 IST2025-02-18T12:11:50+5:302025-02-18T12:14:14+5:30
चितेगावच्या तरुणाने कर्ज काढून उभारला होता व्यवसाय, ३५ लाखांचे नुकसान झाल्याचा मालकाचा दावा

सिग्नलवर डीजेचे वाहन पेटले; कर्ज काढून व्यवसाय सुरू केलेल्या तरुणाचे ३५ लाखांचे नुकसान
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाण्याकडून सेव्हनहिल उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या डीजेच्या टेम्पोने (एमएच ०८ एच ५६४५) अचानक पेट घेतल्यामुळे एकच धावपळ उडाली. बघ्यांनी गर्दी केल्यामुळे काही काळ वाहतुकीची जालना रोडवर कोंडी झाली. दरम्यान, या आगीमुळे डीजेसह वाहनाचे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा मालकाने केला आहे. त्याचवेळी तीन वर्षांपूर्वी कर्ज काढून डीजेचा व्यवसाय उभारला असल्याची माहिती मालकाने 'लोकमत'शी बोलताना दिली.
चितेगाव येथील नितीन विनायक घोडके यांनी तीन वर्षांपूर्वी डीजेचा व्यवसाय सुरू केला होता. त्यासाठी बंद टेम्पोमध्ये डीजेचे सर्व साहित्य बसविलेले होते. त्यातच जनरेटरही ठेवण्यात आले होते. चिकलठाणा परिसरात एका लग्नाची सुपारी असल्यामुळे रविवारी (दि. १६) डीजेसह गाडी त्याठिकाणी गेली होती. सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चिकलठाणावरून हा टेम्पो चितेगावच्या दिशेने निघाला होता. टेम्पाेत चालक स्वप्निल खरवडे होते. मालक दुचाकीवर पुढे हाेते. टेम्पो खंडपीठाच्या सिग्नलवर येताच आतमधुन मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. तेव्हा आजूबाजूच्या वाहनचालकांची एकच धावपळ उडाली. सुरुवातीला धूर आल्यानंतर आतमधून आग बाहेर पडू लागली.
त्याचवेळी अग्निशमन विभागाच्या पथकास कळविण्यात आले. अग्निशमनचे ड्युटी इन्चार्ज मोहन नरके यांच्यासह जवान गोरखनाथ जाधव, दिनेश वेलदोडे, बाबासाहेब ताठे, आदिनाथ बकले व बाबासाहेब गव्हाड यांचे पथक गाडीसह घटनास्थळी पोहोचले. अवघ्या काही वेळातच लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर उपस्थित जमावाने टेम्पोला धक्का मारून रस्त्यावरून बाजूला केले. त्यानंतर खोळंबलेली वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, डीजेच्या टेम्पोमध्येच जनरेटर ठेवण्यात आलेले होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे गरम होऊन जनरेटरने पेट घेतला असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचवेळी लागलेली आग टेम्पोच्या डिझेलच्या टाकीकडे गेली नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचेही उपस्थितांनी सांगितले.
डीजेचे साहित्य जळून खाक
टेम्पोमध्ये असलेले डीजेची मशीन, बारा स्पीकर, एक मशीन मिक्सर, ॲम्प्लिफायर पाच, पीच पट्टी, जनरेटर आणि दोन बॅटरी जळाल्या आहेत. त्याचवेळी टेम्पोचा इतर भागही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. त्यात सर्व मिळून ३५ लाख रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचे डीजे मालक नितीन घोडके यांनी सांगितले. तसेच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खासगी सावकारांकडून कर्ज काढल्याचेही त्यांनी सांगितले. त्यातच डीजेचा विमा नसल्यामुळे संपूर्ण नुकसान मालकालाच सहन करावे लागणार आहे.