'डीजेवाले बाबू मेरा गाणा चला दो'; म्युझिक बंद केल्याने शिवसेना उपशहरप्रमुखाच्या मुलासह चौघांचा बारमध्ये राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 06:52 PM2021-09-04T18:52:22+5:302021-09-04T18:58:44+5:30
बारमध्ये सायंकाळी कोविड नियमानुसार साडेनऊ वाजता सर्व ग्राहकांना सूचना देऊन दहा वाजता बार बंद होणार असल्याचे आवाहन करण्यात आले.
औरंगाबाद : कोविडच्या नियमानुसार बार बंद करण्यात येत असताना साऊंड सिस्टीम का बंद केली म्हणून शिवसेना उपशहरप्रमुखाचा पुत्र तसेच एका संस्थाचालकाच्या मुलासह इतर दोघांनी बार व्यवस्थापकाला बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
बेगमपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एन- ९, भरतनगर, हडको येथे लोटस बार आहे. या बारमध्ये गुरुवारी सायंकाळी कोविड नियमानुसार साडेनऊ वाजता सर्व ग्राहकांना सूचना देऊन दहा वाजता बार बंद होणार असल्याचे आवाहन करण्यात आले. यानुसार बारमध्ये असलेली साऊंड सिस्टीमही बंद करण्याची सूचना व्यवस्थापक दिलीप साहेबराव उचित (वय ५१, भरतनगर, हडको) यांनी सहायक शंकर अधिकारी यांना केली. सहायकाने सिस्टीम बंद केल्यानंतर एका टेबलवर बसलेल्या चौघांनी शंकर यांना शिवीगाळ करीत साऊंड सिस्टीम पुन्हा सुरू करण्यास भाग पाडले. साऊंड सिस्टीम सुरू करण्याचा जाब उचित हे शंकरला विचारत असतानाच अभिषेक हिरा सलामपुरे (रा. बेगमपुरा), अनिकेत रतन वाघ आणि इतर अनोळखी दोघांनी म्युझिक सिस्टीम का बंद करण्यास सांगितली, म्हणून उचित यांना मारहाण करू लागले.
या चौघांनी खाली पाडून उचित यांना बेदम मारहाण केली. अभिषेक याने कमरेचा बेल्ट काढून लोखंडी क्लिपच्या सहायाने उचित यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डाव्या हाताला, डाव्या डोळ्याला आणि उजव्या हाताच्या कोपऱ्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अभिषेक हा शिवसेना उपशहरप्रमुखाचा तर अनिकेत हा संस्थाचालकाचा मुलगा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक विशाल बोडखे करीत आहेत. आरोपींनी पोलिसांत तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचेही तक्रारदाराने फिर्यादीत म्हटले आहे.
हेही वाचा - इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने महिलेसोबत छेडछाड; डॉक्टरला जमावाने बदडले