शरद पवारांना डी.लिट. देण्याचा विद्यापीठाचा ठराव; निर्णय राज्यपाल घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 11:33 AM2020-02-05T11:33:02+5:302020-02-05T11:36:56+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत निर्णय
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना डी.लिट. पदवी देण्याचा ठराव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत एकमताने मंजूर झाला. दरम्यान, विद्यापीठातील अधिसभा (सीनेट) हे सर्वोच्च सभागृहात या ठरावाला मान्यता मिळाल्यानंतर तो राज्यपालांच्या निर्णयास्तव सादर केला जाईल. राज्यपालांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर डी.लिट. पदवी देण्याचा निर्णय अंतिम होईल.
व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी आज मंगळवारी बैठकीत हा ठराव मांडला. तो एकमताने मंजूर झाला. या विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा धाडसी निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतला. त्यामुळे शरद पवार यांना डी.लिट. देण्याचा निर्णय यापूर्वी तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी घेतला होता. त्यास विरोध झाल्यामुळे तो ठराव थंडबस्त्यात गेला. दरम्यान, आज व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा ठराव मान्य झाला. तो ठराव आता १३ मार्च रोजी होणाऱ्या अधिसभेच्या बैठकीसमोर ठेवला जाणार आहे. अधिसभेने मान्यता दिल्यास पुढील निर्णयास्तव तो विद्यापीठाकडून राज्यपाल कार्यालयाकडे पाठविला जाईल. राज्यपालांनी निर्णय घेतल्यानंतर डी.लिट. पदवी दिली जाईल.
दरम्यान, आजच्या या बैठकीत विद्यापीठाच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. आता हा अर्थसंकल्प पुढील महिन्यात होणाऱ्या अधिसभेच्या बैठकीसमोर जाईल. याशिवाय, पदवी वितरण समारंभासही मान्यता देण्यात आली. तथापि, पदवीदान समारंभासाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, कुलगुरू, प्रकुलगुरू आदी पदाधिकाऱ्यांचा ‘ड्रेसकोड’ बदलण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. आता पदाधिकाऱ्यांना पांढरा नेहरू शर्ट, चुडीदार पायजमा व विद्यापीठाचा लोगो असलेले उपरणे या ‘ड्रेसकोड’ला मान्यता देण्यात आली. रत्नागिरी येथील विद्यापीठाचे उपकेंद्र बंदावस्थेत आहे. त्याला चालना देण्यासाठी उच्चशिक्षणमंत्री, तेथील स्थानिक आमदारांसोबत व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
डॉ. फुलचंद सलामपुरे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासंंबंधी समिती स्थापन करण्यात आली. या समितीत डॉ. राजेश करपे, राहुल म्हस्के, सुनील निकम, छ. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे संचालक, विद्यार्थी कल्याण विभागाचे डॉ. मुस्तजीब खान हे सदस्य असतील. ‘नॅक’वर अवास्तव खर्च झाल्याबाबत चौकशीसाठी निंबाळकर समिती स्थापन केली होती. त्या समितीत काही नवीन सदस्य वाढविण्यात आले. याशिवाय आजच्या या बैठकीत संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे तैलचित्र १२ मार्च रोजी, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र १४ एप्रिल रोजी विद्यापीठात लावण्याचा निर्णय झाला.
गोपीनाथ मुंडे ग्रामीण विकास संस्थेच्या संचालकास विरोध
आजच्या व्यवस्थापन परिषदेत विद्यापीठातील गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण संशोधन संस्थेवर तत्कालीन सल्लागार समितीने नियुक्त केलेल्या संचालकास रुजू होण्यासाठी विरोध करण्यात आला. ३ जानेवारी रोजी विद्यमान शासनाने यापूर्वी सर्व शासकीय व अशासकीय समिती, मंडळांवर सदस्य, संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यानुसार या संशोधन संस्थेवर निवडण्यात आलेल्या रमेश पांडव यांना रुजू करून घेऊ नये, असा आग्रह सदस्यांनी धरला. त्यानुसार कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी यासंबंधी शासनाला पत्र पाठवून माहिती जाणून घेण्यात येईल, असे सांगितले. तथापि, आजची ही बैठक तहकूब करण्यात आली आहे.