‘डीएमआयसी- समृद्धी’ कनेक्टिव्हिटीचा तिढा सुटेना, भूसंपादनाच्या मावेजावरून शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 06:08 PM2022-01-08T18:08:04+5:302022-01-08T18:15:27+5:30

‘एमएसआरडीसी’कडे ४१.१४ कोटी आगाऊ रक्कम जमा

‘DMIC-Samrudhi Mahamarga’ connectivity issue does not resolve | ‘डीएमआयसी- समृद्धी’ कनेक्टिव्हिटीचा तिढा सुटेना, भूसंपादनाच्या मावेजावरून शेतकरी आक्रमक

‘डीएमआयसी- समृद्धी’ कनेक्टिव्हिटीचा तिढा सुटेना, भूसंपादनाच्या मावेजावरून शेतकरी आक्रमक

googlenewsNext

- विजय सरवदे
औरंगाबाद : समृद्धी महामार्गाने (Samruddhi Mahamarg) दिलेल्या रकमेएवढाच भूसंपादनाचा मावेजा मिळावा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे या महामार्गाला ‘डीएमआयसी’ची ( DMIC ) कनेक्टिव्हिटी देण्याचा वाद चिघळला आहे. दरम्यान, जानेवारीअखेरपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यासाठी एमआयडीसीला एकूण ८ एकर भूसंंपादन करावे लागणार आहे. तथापि, समृद्धी महामार्गावर इंटरचेंज उभारणीच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला एमआयडीसीकडून ४१.१४ कोटींची आगाऊ रक्कम प्राप्त झाली आहे.

प्राप्त रकमेतून ‘एमएसआरडीसी’कडून समृद्धी महामार्गावर केवळ इंटरचेंज उभारले जाणार आहे. इंटरचेंजपासून शेंद्रा औद्योगिक वसाहतीपर्यंत जवळपास ९०० मीटर लांबीचा रस्ता एमआयडीसीला करावा लागणार आहे. इंटरचेंजसाठी ४ एकर आणि रस्त्यासाठी ४ एकर असे एकूण ८ एकर भूसंपादन एमआयडीसीला करावे लागणार आहे. समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करताना एमएसआरडीसीने शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा पाच पट मावेजा दिला होता. तेवढाचा मावेजा एमआयडीसीने द्यावा, या मुद्यावर शेतकरी अडले आहेत. तथापि, एमआयडीसीने शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या असून त्यावर हरकती, खुलासे मागविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. जानेवारीअखेरपर्यंत भूसंपादनाचा प्रश्न निकाली निघेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

‘डीएमआयसी’ या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे बहुराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करायचे असेल, तर या शहराची दळणवळणाची सुविधा उत्तम असायला हवी. यासाठी औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली पाहिजे. येथून मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टपर्यंत (जेएनपीटी) मालवाहतुकीसाठी रेल्वेसेवा व रस्त्याची सुविधा असायला हवी. दुसरीकडे औरंगाबादेतून जाणाऱ्या ‘सुपर एक्स्प्रेस वे’ अर्थात समृद्धी महामार्गाला ‘डीएमआयसी’ची कनेक्टिव्हिटी असावी, अशी उद्योग संघटनांची अपेक्षा आहे.

वाहतुकीला अडथळा येणार नाही
‘एमआयडीसी’कडून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेथून पुढे तीन ते चार महिन्यांत समृद्धी महामार्गावर इंटरचेंज उभारणीचे काम पूर्ण होईल. तत्पूर्वी, जर या महामार्गावरून वाहतूक सुरू झाली, तरीही कनेक्टिव्हिटीच्या कामाचा अडथळा येणार नाही. मात्र, इंटरचेंज व एमआयडीसीच्या पोहोच रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच समृद्धी महामार्गावरून ‘डीएमआयसी’ची वाहतूक सुरू होईल.

Web Title: ‘DMIC-Samrudhi Mahamarga’ connectivity issue does not resolve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.