‘डीएनए’ने चाचणीने केली सरपंचाची पोलखोल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 07:34 PM2020-01-30T19:34:18+5:302020-01-30T19:38:39+5:30
मराठवाड्यातील एकमेव असलेल्या औरंगाबादेतील डीएनए प्रयोगशाळेमुळे अनेक प्रकरणांचा उलगडा होत आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्यास सदस्याला अपात्र ठरविण्याची तरतूद ग्रामपंचायत कायद्यात आहे. त्यामुळे एका सरपंचाने तिसरे अपत्य आपले नसल्याचे दाखविण्याचा खटाटोप केला, तिसरे अपत्य चक्क भावाचे असल्याचे म्हटले. मात्र, विरोधी गटाने हे प्रकरण उचलून धरले. अखेर ‘डीएनए’ने चाचणीने पोलखोल केली. हे अपत्य सरपंचाचेच असल्याचे निष्पन्न झाले आणि त्याला सरपंचपपद गमवावे लागले. मराठवाड्यातील एकमेव असलेल्या औरंगाबादेतील डीएनए प्रयोगशाळेमुळे अशा अनेक प्रकरणांचा उलगडा होत आहे.
छावणीतील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत ३ वर्षांपूर्वी डीएनए विभाग कार्यान्वित झाला. राज्यभरात १३ प्रयोगशाळा आहेत. यात मराठवाड्यात फक्त औरंगाबादेतील प्रयोगशाळेतच डीएनए चाचणीची सुविधा आहे. डीएनए चाचणीद्वारे महिन्याला २५ ते ३० प्रकरणांचा उलगडा होण्यास मदत होत आहे. डोळ्यांना न दिसणाऱ्या बॅक्टेरियापासून ते थेट वनस्पती, प्राणी आणि मनुष्यापर्यंतच्या सगळ्या सजीवांमध्ये असलेले जनुकीय घटक (जेनेटिक मटेरियल) ज्यापासून बनतात, ते रेणू म्हणजे डीएनए. सजीवातील सगळ्या ‘डीएनए’मधील घटकांचा क्रम कसा आहे, हे शोधल्यास त्याआधारे माहितीचा वेध घेता येतो. त्यामुळे विविध घटनांच्या तपासात डीएनए चाचणी महत्त्वाची भूमिका निभावत आहे. वर्ष २०१८ मध्ये बीड येथील जिल्हा रुग्णालयात बाळ बदली प्रकरण चांगलेच गाजले होते. बाळाच्या नातेवाइकाने आम्हाला मुलगा झाला होता, रुग्णालय मुलगी देत असल्याची तक्रार केली होती. अशा परिस्थितीत त्या नवजात बाळाची डीएनए चाचणी करण्यात आली. त्यानंतर मुलगी कोणाची आणि मुलगा कोणाचा, हे निप्षन्न झाले.
चिमुरड्याच्या हत्येचा छडा
२०१७ मध्ये १० वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण केल्यानंतर दौलताबाद घाटात हत्या केल्याच्या घटनेने औरंगाबादेत एकच खळबळ उडाली होती. आरोपींनी खून करण्यासाठी रुमालाचा वापर केला होता. तेव्हा आरोपींकडे सापडलेल्या या रुमालावरील रक्ताचे डाग आणि चिमुरड्याचे रक्त नमुने एकच असल्याचे डीएनए चाचणीवरून स्ष्ट झाले होते. हा पुरावा आरोपींना शिक्षा होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.
शरीराच्या कोणत्याही भागाद्वारे चाचणी
औरंगाबादेतील प्रयोगशाळा ही राज्यातील तिसऱ्या क्रमाकांची प्रयोगशाळा आहे. मराठवाड्यातील एकमेव डीएनएची प्रयोगशाळा आहे. पोलीस तपासासह अनेक प्रकरणांत या विभागाद्वारे तपासणी केली जाते. रक्त, घाम, केस, हाडे, बोन मॅरो, त्वचा, दात अशा शरीरातील कोणत्याही भागाद्वारे डीएनए चाचणी करणे शक्य आहे.
- रा.रा. मावळे, उपसंचालक, प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा