चांगले कर्म करा, सत्याचा संकल्प करा -शंकराचार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:04 AM2018-06-09T01:04:07+5:302018-06-09T01:04:36+5:30
वेरूळ येथील अतिरुद्र अभिषेक सोहळ्याची थाटात सांगता
वेरूळ : वाईट कर्म करू नका, चांगले कर्म करा, सत्याचा संकल्प करा, असा उपदेश जगद्गुरू शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी येथे केला. अधिक मासानिमित्त वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात ४ जूनपासून सुरू असलेल्या अतिरुद्र अभिषेक सोहळ्याची सांगता शुक्रवारी थाटात करण्यात आली.
यंदा दर्भतीर्थाने (कुश) पाच दिवस घृष्णेश्वरास अतिरुद्र अभिषेक करण्यात आला. यामुळे पाच दिवस गाभारा दर्शन बंद ठेवण्यात आले होते. भाविकांना या काळात सभामंडपातूनच दर्शन घ्यावे लागले. शुक्रवारी करवीर पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी, समाजरत्न श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज, विद्यावामदेवानंद तीर्थस्वरूप टाकास्वामी वेरूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता झाली.
यावेळी शंकराचार्यांनी सांगितले की, अधर्माने माणूस वागला की, पापाचा संचय वाढतो, पापाचे दुसरे नाव म्हणजे अधर्म आणि दु:ख आहे. त्यामुळे वाईट कर्म करू नका, चांगले कर्म करा, सत्याचा संकल्प करा, यामुळे पापाचा क्षय होतो आणि पुण्याचा उदय होतो व सुख मिळते, असे अनेक दाखले देत त्यांनी भाविकांना उपदेश केला.
अतिरुद्र अभिषेकाच्या काळात २५१ ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात घृष्णेश्वर महादेवास अतिरुद्र या पूजा प्रकारात १४,६४१ अभिषेक म्हणजे ११ महारुद्र संपन्न झाले. अखंडित चाललेल्या या अतिरुद्रास तीन तासांकरिता एका वेळी चाळीस ब्रह्मवृंद मंत्रपठण करीत होते. यावेळी तांदळाचा सर्वतोभद्र मंडल बनविण्यात आला होता.
सांगतेप्रसंगी गरीब, शेतकरी, दिव्यांग बांधवांना शिधा व वस्त्र वाटप करण्यात आले. यावेळी धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले, राजेंद्र पवार, विष्णू महाराज, शिवाभाऊ अंगूलगावकर, देवस्थान अध्यक्ष दीपक शुक्ला, अतिरुद्र अध्यक्ष परेश पाठक, कार्यकारी विश्वस्त कमलाकर विटेकर, मुख्य पुजारी रवी पुराणिक, संजय वैद्य, योगेश टोपरे, शशांक टोपरे, सुनील शास्त्री, सुनील विटेकर, रावसाहेब शास्त्री यांच्यासह अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविकांची मोठी उपस्थिती होती. प्रास्ताविक अॅड. मिलिंद जोशी यांनी केले. महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.