रेल्वे प्रश्नांसाठी पेन्शनचे पैसे खर्च करणाऱ्या ‘त्या’ ज्येष्ठाला तरी न्याय द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:04 AM2021-03-16T04:04:51+5:302021-03-16T04:04:51+5:30
औरंगाबाद : औरंगाबादेत ओमप्रकाश वर्मा नावाची एक ज्येष्ठ व्यक्ती आहे. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य रेल्वे प्रश्नांसाठी दिले. पेन्शनचे ...
औरंगाबाद : औरंगाबादेत ओमप्रकाश वर्मा नावाची एक ज्येष्ठ व्यक्ती आहे. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य रेल्वे प्रश्नांसाठी दिले. पेन्शनचे पैसे खर्च करून रेल्वेमंत्री, रेल्वे अधिकाऱ्यांकडे जातात. इतक्या वर्षांपासून मराठवाड्याला न्याय मिळत नाही, असे वर्मा म्हणतात. रेल्वेच्या विकासासाठी संपूर्ण आयुष्य देणाऱ्या ओमप्रकाश वर्मा आणि मराठवाड्याला न्याय देण्यासाठी रेल्वे विकासासाठी साथ द्या, अशी मागणी सोमवारी लोकसभेत खा. इम्तियाज जलिल यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली.
खा. इम्तियाज जलिल यांनी लोकसभेत मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांकडे लक्ष वेधले. यंदाच्या अर्थसंकल्पात दक्षिण मध्य रेल्वेला मिळालेल्या निधीपैकी नांदेड विभागाच्या वाट्याला केवळ ९८ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मिळाला. परभणी-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा २०१३-१४ च्या ब्लू बुकमध्ये समावेश करण्यात आला; परंतु २०१८ मध्ये हे दुहेरीकरण बाजूला ठेवण्यात आल्याचे समोर आले. हा मार्ग फायद्यात असतानाही तो का केला जात नाही, अशी विचारणा खा. जलिल यांनी केली. औरंगाबाद-चाळीसगाव या ८८ कि.मी.चा मार्गही होत नाही. माॅर्डन रेल्वेस्टेशनचे काम ५ वर्षांपासून रेंगाळले आहे. औरंगाबादमार्गे धावणारी कोल्हापूर-धनबाद ही रेल्वे अन्य मार्गाने वळविण्यात आली. रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे महाराष्ट्राचे आहे. त्यामुळे मराठवाड्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली; परंतु तसे होत नाही. मराठवाड्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन रेल्वे प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी मागणी खा. जलिल यांनी केली.