धर्माची मानहानी होईल असे वर्तन करू नये; चंद्रकांत खैरेंचा शांतिगिरी महाराजांना सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 03:32 PM2018-01-22T15:32:57+5:302018-01-22T15:42:03+5:30
शांतिगिरी महाराजांना आपण या आधी एकदा निवडणुकीत पराभवाची धूळ चारली आहे. यामुळे त्यांनी धर्म मानहानी होईल असे वर्तन करू नये असा सल्ला खासदार चंद्रकांत खैरे यांनी शांतिगिरी महाराजांना दिला. ते लोकमत प्रतिनिधीशी शांतिगिरी महाराजांच्या लोकसभेच्या संभाव्य उमेदवारीबद्दल बोलत होते.
औरंगाबाद : शांतिगिरी महाराजांना आपण या आधी एकदा निवडणुकीत पराभवाची धूळ चारली आहे. यामुळे त्यांनी धर्म मानहानी होईल असे वर्तन करू नये असा सल्ला खासदार चंद्रकांत खैरे यांनी शांतिगिरी महाराजांना दिला. ते लोकमत प्रतिनिधीशी शांतिगिरी महाराजांच्या लोकसभेच्या संभाव्य उमेदवारीबद्दल बोलत होते.
गेल्या महिन्यात शांतीगिरी महाराजांची महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन स्नेहभोजन घेतले होते. त्यानंतर जाहीरपणे पहिल्यांदाच रविवारी ते एनजीओच्या मेळाव्यात मार्गदर्शनासाठी आले होते. यावेळी बोलतांना त्यांनी औरंगाबादमधून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्याचे सूचक वक्तव्य केले होते. याबाबत खासदार खैरे यांची प्रतिक्रिया लोकमत प्रतिनिधीने जाणून घेतली.
यावेळी खा. खैरे म्हणाले, शांतिगिरी महाराजांना आपण या आधी एकदा निवडणुकीत पराभवाची धूळ चारली आहे. यामुळे त्यांनी धर्म मानहानी होईल असे वर्तन करू नये. तसेच काल झालेला एनजीओचा मेळावा हे शासकीय व्यासपीठ असेल तर तेथे महाराजांना का बोलावले. त्यांची कोणती एनजीओ आहे. याबाबत विभागीय आयुक्तांना जाब विचारू असेही खा. खैरे म्हणाले.
भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी दोन इच्छुक
दरम्यान काल चिकलठाण्यातील कलाग्राम येथे अनुलोम संस्था, सीआयआय, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाजमंडळातर्फे एनजीओ मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या व्यासपीठावर शांतीगिरी महाराज आणि विभागीय आयुक्त डॉ. भापकर या दोन्ही लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या उभयतांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले शांतीगिरी महाराज आणि डॉ. भापकर हे दोघेही एकाच व्यासपीठावर राज्यात सरकारच्या योजना प्रचार-प्रसार करण्याचे काम करणार्या संस्थेबरोबर आल्यामुळे दोघांपैकी एक भाजपचा उमेदवार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.