नका करू दादागिरी, पाणी सोडा नाथसागरी; मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर जालना रोडवर रस्तारोको
By बापू सोळुंके | Published: November 20, 2023 01:02 PM2023-11-20T13:02:52+5:302023-11-20T13:03:41+5:30
जोपर्यंत पाणी सोडले जात नाही तोपर्यंत हा रास्ता रोको सुरूच ठेवण्याचा निर्णय यावेळी आंदोलकांनी घेतला.
छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याच्या हक्काचे ८.६ टीएमसी पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी रोखून धरले ,हे पाणी तातडीने सोडावे या मागणीसाठी सोमवारी सकाळी 11 वाजेपासून जालना रोडवर सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन सुरू झाले आहे.
या आंदोलनात माजी मंत्री राजेश टोपे, शिवसेनेचे प्रवक्ता संजय शिरसाठ, माजी मंत्री अर्जुन खोतकर, अनिल पटेल, माजी आमदार डॉ. कल्याण काळे ,अण्णासाहेब माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार किशोर पाटील ,माजी आमदार नामदेव पवार, उद्योजक अर्जुन गायके, मसीआ संघटनेचे पदाधिकारी पाणी हक्क परिषदेचे पदाधिकारी यांच्यासह भाजप वगळता सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
पाणी आमच्या हक्काचे,नाही कुणाच्या बापाचे, अहमदनगर नाशिकच्या पुढार्यांचे करायचे काय खाली,मुंडकं वर पाय, देत कसे नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही, विखे पाटील मुर्दाबाद होश मे आओ, होश मे आओ, देवेंद्र फडणवीस होश मे आओ, नका करू दादागिरी, पाणी सोडा नाथसागरी, अशा घोषणा आंदोलन करते देत होते .यावेळी जालना रोडच्या दोन्ही लेनवर आंदोलक बसल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जोपर्यंत पाणी सोडले जात नाही तोपर्यंत हा रास्ता रोको सुरूच ठेवण्याचा निर्णय यावेळी आंदोलकांनी घेतला.