'नागरिकांच्या प्रश्नाला मजाक समजू नका'; महापौरांना आमदाराचा घरचा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 03:26 PM2019-08-30T15:26:31+5:302019-08-30T15:28:42+5:30

पोलिसांतर्फे आयोजित समारंभात राजकारण 

'Do not consider the citizens' question a joke'; MLA Sanjay Sirsat to the Mayor | 'नागरिकांच्या प्रश्नाला मजाक समजू नका'; महापौरांना आमदाराचा घरचा अहेर

'नागरिकांच्या प्रश्नाला मजाक समजू नका'; महापौरांना आमदाराचा घरचा अहेर

googlenewsNext
ठळक मुद्देकिमान गणेशोत्सवात तरी पथदिवे आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावाआश्वासन देऊन जनतेची बोळवण करू नका ठोस भूमिका घ्यायला शिकले पाहिजे

औरंगाबाद : शहरातील नागरी सुविधांबाबत तीव्र प्रतिक्रिया देत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनीही गुरुवारी महापौर नंदकुमार घोडेले यांना घरचा अहेर दिला. 

बागडे यांनी बुधवारी महापौरांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करून महापौरांच्या कारभारामुळे चंद्रकांत खैरे पराभूत झाल्याचे म्हटले होते. गुरुवारी आ. शिरसाट यांनी बागडेंच्या विधानाचा धागा धरून पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत महापौरांना सुनावले. आ. शिरसाट म्हणाले की, जनतेच्या प्रश्नाला तुम्ही मजाक समजू नका शहरातील खड्डे,कचरा, पथदिवे अशा विविध प्रश्नांवर नागरिकांत तीव्र असंतोष आहे. सातारा परिसरातील आमदार रोडवर दोन दिवसांपूर्वी जाऊन आलो त्या रस्त्याची अवस्था वाईट झालेली असून, याच रोडवर उघड्यावर होणाऱ्या मांस विक्रीमुळे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. कुत्र्यांच्या दहशतीमुळे एकटा माणूस या रस्त्याने पायी जाऊ शकत नाही. ही कुत्रे नागरिकांवर हल्ला चढवितात. आयुक्तांना फोन लावला की, मी दिल्ली अथवा इतर ठिकाणी मीटिंगला जात आहे, असे सांगून वेळ मारून नेतात. अधिकाऱ्यांना परिसरातील प्रश्नांविषयी सांगितल्यास साहेब त्वरित काम करतो; पण ते काम पूर्ण केलेलेच नाही. काही अधिकारी सांगतात माझ्याकडे तो अधिकार नाही, तर महापौरसाहेब तुम्ही या अधिकाऱ्यांचा जंगी सत्कार करा. जनतेच्या प्रश्नांविषयी त्यांना काही देणे घेणे नाही. यामुळे मनपाची प्रतिमा जनमानसात वाईट गेली आहे. तुम्ही फक्त आश्वासन देऊन जनतेची बोळवण करू नका ठोस भूमिका घ्यायला शिकले पाहिजे, अशा शब्दात सुनावले. 

असे तर २५ वर्षे लागतील
महापौरांसोबत एका कार्यक्रमात जाण्याचा योग आला तेव्हा अधिकाऱ्याला कुत्र्यांच्या बंदोबस्ताविषयी विचारले असता अधिकारी म्हणाले की, साहेब आम्ही दररोज चार कुत्र्यांची नसबंदी करतो आहे. हे उत्तर ऐकून डोके चक्रावून गेले. या वेगाने तुमची वाटचाल असेल, तर २५ वर्षे तुम्ही या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करू शकत नाही, असा खरपूस समाचार घेत किमान गणेशोत्सवात तरी पथदिवे आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावा, अशा कानपिचक्या आ. शिरसाट यांनी महापौरांना दिल्या.  

धडकी भरली...
भाषणातून हल्ला होत असल्याने आता मनात धडकी भरली आहे, चांगले झाले माझ्यावर कोणी घसरले नाही; परंतु थोड्याच वेळात आ. शिरसाट यांनी टीकास्त्र सोडल्याने महापौर घोडेलेंची भांबेरी उडाली.

खैरे यांच्या पराभवाची दुसरी कारणेही बागडेच पुढे आणतील 
लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवासाठी महापालिका हे एक कारण असू शकते. मात्र, इतरही आणखी राजकीय कारणे आहेत. ती दुसरी कारणे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हेच पुढे आणतील, असे प्रत्युत्तर महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी दिले. 

Web Title: 'Do not consider the citizens' question a joke'; MLA Sanjay Sirsat to the Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.