दबाव गटातून कुणावर अन्याय करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:56 AM2018-05-10T00:56:11+5:302018-05-10T00:58:25+5:30
दबावगट निर्माण करून कोणत्या घटकावर अन्याय करू नका, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. सिद्धार्थ खरात यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सामाजिक समता प्रस्थापित होण्यासाठी राज्य घटनेत आरक्षणाची तरतूद केली. या तरतुदीच्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकारने अंमलबजावणीसंदर्भात वेळोवेळी सूचना, निर्णय, कायदे निर्माण केले. याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आरक्षण कक्षावर आहे. या कक्षाच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे. मात्र, यातून दबावगट निर्माण करून कोणत्या घटकावर अन्याय करू नका, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. सिद्धार्थ खरात यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आरक्षण कक्ष विभागातर्फे ‘आरक्षण ध्येय-धोरण व अंमलबजावणी’ या विषयावर बुधवारी (दि.९) सिफार्ट सभागृहात एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. यावेळी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. पुरण मेश्राम, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे, समन्वयक डॉ. शंकर अंभोरे उपस्थित होते. यावेळी डॉ. खरात म्हणाले, ज्या विद्यापीठांमध्ये आरक्षण कक्ष सक्षम आहे. त्या विद्यापीठासह महाविद्यालयांतील रिक्त जागा भरण्यात येतात. मात्र, ज्या ठिकाणी हा विभाग कमकुवत असतो. त्याठिकाणी अक्षम्य विलंब होतो. रोस्टर कसे मंजूर करावे, याची माहितीही अनेकदा आरक्षण कक्षातील अधिकाऱ्यांनाच नसते. त्यामुळे रोस्टर मंजूर होण्यास विलंब होऊन रिक्त जागा वाढत जातात. विभागीय आयुक्तालयातील आरक्षण कक्षाचे सहआयुक्त आणि विद्यापीठातील आरक्षण कक्षातील कर्मचाºयांचे समन्वय असणे आवश्यक आहे. यासाठी अधिकारी- कर्मचाºयांना आरक्षणासंदर्भात प्रशिक्षण देण्यात यावे, असेही डॉ. खरात यांनी सांगितले. उद्घाटन सत्रानंतर एकूण दोन सत्र घेण्यात आले. त्यात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
अल्पसंख्याक समाजात पीएच. डी.चे अत्यल्प प्रमाण
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिकण्याचा मंत्र दिला. यातून अनुसूचित जाती विभागातील समाजाने अंमलबजावणी केली. राज्यात होणाºया एकूण पीएच. डी.मध्ये अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण हे १९ टक्के आहे. या समाजाची लोकसंख्या १६ टक्के आहे. अनुसूचित जमातीतील लोकसंख्या ७ टक्के असताना त्या समाजातील पीएच. डी.चे प्रमाण २.७ टक्के एवढे आहे. याच तुलनेत अल्पसंख्याक समाजातील पीएच. डी.चे प्रमाण केवळ ०.५९ इतके अत्यल्प आहे. हे चित्र निराशाजनक असल्याचे डॉ. खरात यांनी स्पष्ट केले.
आम्ही सर्व्हंट... संस्थाचालकांना बोलवा
आरक्षणावरील कार्यशाळेचे उद्घाटन होताच ज्येष्ठ प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे सभागृहात उभे राहिले. आमच्यासाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. मात्र, आरक्षण आणि अंमलबजावणी करणारे हे संस्थाचालक असतात. आम्ही सर्व्हंट आहोत. आमच्याऐवजी त्यांची कार्यशाळा घ्या, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.