न्यायालय आदेशाचे पालन होईना !
By Admin | Published: September 1, 2014 12:22 AM2014-09-01T00:22:52+5:302014-09-01T01:09:39+5:30
बीड : माजलगाव नगर परिषद अंतर्गत काम करणाऱ्या सफाई कामगारांचे फरक वेतन द्यावे, असे आदेश औरंगाबाद कामगार न्यायालयाने दिले होते़
बीड : माजलगाव नगर परिषद अंतर्गत काम करणाऱ्या सफाई कामगारांचे फरक वेतन द्यावे, असे आदेश औरंगाबाद कामगार न्यायालयाने दिले होते़ मात्र या आदेशाचे पालन केले जात नसून त्यांना अद्यापपर्यंत वेतनातील फरक मिळालेला नाही़
माजलगाव येथील नगर परिषद सफाई कामगारांना वेतनातील फरक मिळत नसल्याने त्यांनी औरंगाबाद येथील कामगार न्यायालयात धाव घेतली होती़
तेथे दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेऊन कामगार न्यायालयाने मागील नऊ महिन्यातील वेतन फरक देण्यात यावा, असे आदेश दिले होते़ हे आदेश देऊन महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे तरीही या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ होत आहे़
न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नसल्यामुळे सफाई कामगार आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत़ वेतनातील फरक मिळेपर्यंत काम करणार नसल्याची भूमिका सफाई कामगार घेणार आहेत़
तात्काळ निर्णय झाला नाही तर सप्टेंबर महिन्यापासून आमरण उपोषण करण्याचा विचार त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रकात नमूद केला आहे़
१ जानेवारी २०१४ रोजी उपोषणाला बसला होतो त्यावेळी माजलगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दोन महिन्यात पगार देऊ, असे आश्वासन दिले होते़ त्यानंतर केवळ एकच महिन्याचे वेतन देण्यात आले़ दुसरा पगार आजपर्यंत देण्यात आलेला नाही़ लेखी आश्वासन देऊन आमचा विश्वासघात केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे़ आम्हाला ११ महिन्यांचा पगार व न्यायालयीन आदेशानुसार वाढीव फरक देण्याची मागणी त्यांनी दिलेल्या पत्रकात केली आहे़
या निवेदनावर रंगनाथ बोराडे, राहीबाई जाधव, लंकाबाई शिंदे, अनिता डोळस, गौळणबाई घडसे, वसत्लाबाई बोराडे, रुक्मिणबाई उजगरे, शशिकला लोंढे, सागरबाई पंडित यांच्या स्वाक्षऱ्या आहेत़
माजलगावच्या मुख्याधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही़ (प्रतिनिधी)