गाडीने होऊ नये, जिवाची बिघाडी
By Admin | Published: June 10, 2014 12:03 AM2014-06-10T00:03:08+5:302014-06-10T00:52:13+5:30
लातूर-$गेल्या आठवड्यात भाजपाचे नेते व केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत अपघाती निधन झाले़
लातूर-$गेल्या आठवड्यात भाजपाचे नेते व केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत अपघाती निधन झाले़ मुंडे यांनी सीट बेल्ट घातला असता तर कदाचित माझा मित्र वाचू शकला असता, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केली होती़ त्या पार्श्वभूमीवर सीट बेल्टसह इतर सुरक्षा व्यवस्थेचा किती काळजीपूर्वक वापर होतो, नेत्यांच्या ड्रायव्हरना त्यासंबंधीचे कितपत भान असते, येथपासून ते नेतेही त्याबाबत किती बेफिकीर असतात यावर प्रकाशझोत़़़ त्यांच्या जीविताची सर्वांनाच काळजी वाटते म्हणूऩ़़़!
नेत्यांना काही सूचना़़़़
नेत्यांनी कार्यक्रमासाठी दिलेल्या वेळा पाळल्यास विलंब टाळता येऊ शकतो़
कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कार्यक्रमांची संख्या वाढवायची आणि मग पळापळ होते़
आपला चालक वेळेत जेवला आहे का, त्याला काही प्रकृतीचा त्रास आहे का, त्याला विश्रांतीची गरज आहे का, हे पाहण्याची जबाबदारी नेत्यांचीच असते़
कायम एकच ड्रायव्हर घेण्यापेक्षा त्यांच्या आळीपाळीने ड्यूटी लावल्यास जास्त योग्य़
आपण नेते आहोत म्हणून नियम मोडण्यात आपणच पुढाकार घेतो़ ते टाळल्यास दुर्घटना टाळली जाऊ शकते़
रोज आपण किती प्रवास करायचा याचेही बंधन घालून घ्यायला हवे़
ही काळजी घ्या़़़
वेगाचे भान राखा़ कायद्याने हलक्या मोटारगाडीवर वेगाचे बंधन नसले तरी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी वेग मर्यादित ठेवा़
गाडीत मागे व पुढे बसणाऱ्या सर्वांनी सीट बेल्ट बांधावेत़
चालकांनी दररोज गाडीच्या इंजिनची पाहणी करावी़ जरा जरी संशय आल्यास दुर्लक्ष न करता मेकॅनिकला तत्काळ दाखवावे़
वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नका़
गाडीतील हवा व ब्रेक सिस्टिमची नियमित तपासणी करावी़
महत्त्वाच्या लोकांच्या ताफ्यातील गाड्यांकडे विशेषत: लहान मुले कुतुहलाने पाहतात़ कोणी आडवे येत नाही ना, याची दक्षता घ्या़
कमी वेळात जास्त अंतर कापण्यासाठी चालकास वेगात वाहन चालविण्याची सक्ती करणे टाळा़
मेंटेनन्सअभावी वाहनचालकांची कसरत...
लातूर : जिल्हाधिकारी कार्यालयातंर्गत महसूल विभागाच्या ताफ्यात १८ वाहने आहेत़ परंतु, या १८ वाहनांच्या दुरुस्ती, देखभालीसाठी प्रत्येक वर्षाला प्रत्येक वाहनाला २० हजार रुपये शासन दरबारी दिले जातात़ मात्र, इतक्या कमी निधीमुळे कधी या वाहनांचे टायर फुटणे, कधी ब्रेक निकामी होणे, तर कधी बंद पडणे अशा संकटांना या वाहनचालकांना तोंड द्यावे लागते़
विशेष म्हणजे, वाहन रस्त्यात बंद पडले की, गाडीतील साहेब आहे त्या परिस्थितीत दुसरे खासगी वाहन बोलावून निघून जातात़ मग तेथून पुढे चालकाची कसरत सुरु होते़ अशा एक ना अनेक परिस्थितीत शासकीय वाहनचालकांना दररोज संकटांनाच सामोरे जावे लागते़ शासकीय कामांसाठी ही वाहने फिरवली जातात़ दगड, मुरुड, माती, ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते, अशा ठिकाणी भेट देण्यासाठी अधिकारीवर्गही शासकीय वाहनेच वापरतात़ यामध्ये वाहनांची देखभाल करण्याचेही काम प्रसंगी खिशातून पैसे घालून वाहनचालकांना करावे लागते़ मंत्र्यांच्या ताफ्यात शासकीय अधिकाऱ्यांनाही सहभागी व्हावे लागते़ अशावेळी योग्य मेंटेनन्स नसलेली वाहनेही वापरावी लागतात आणि त्यांच्या अत्याधुनिक पध्दतीच्या वाहनांबरोबर ही वाहने पळवावी लागतात़ त्यामुळे वाहन चालवताना वाहनांतील जिवांबरोबर स्वत:चाही जीव अक्षरश: टांगणीला लागतो़
आमचे दिवसाचे नियोजन व्यस्त असते़ त्यामुळे वाहन असले तरी धावपळ होतेच़ तरी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे़ अहमदपुरातून बाहेर प्रवास करताना मी सीट बेल्ट आवर्जून बांधतो़
- बाबासाहेब पाटील, आमदाऱ
नेतेमंडळींसह अधिकाऱ्यांनी वाहन चालकाकडे एक माणूस म्हणून पाहावे़ चालक लोक असंघटित असल्याने त्यांच्यावर कोणत्याही कामाचे बंधन नसते़ त्यांना कधीही बोलावणे येईल तेव्हा गाडीवर जावे लागते़ ड्रायव्हरची वाहन चालविण्याची मानसिकता आहे का? त्याची झोप व्यवस्थित झाली आहे का? त्याने जेवण वेळेत घेतले आहे का? हे पाहणे गरजेचे आहे़ - डी़ बी़ माने, रस्ता सुरक्षा समिती
लातूरच्या प्रकाशनगरातील शंकर साळुंके हे गेल्या चार वर्षापासून खासदार डॉ़ सुनील गायकवाड यांचे वाहनचालक आहेत़ गायकवाड यांच्याकडून विश्रांतीबाबतही काळजी घेतली जाते़ परंतु, आता कामाचा व्याप वाढला आहे़ त्यांनी सुरक्षित प्रवासासाठी माझ्यासह अन्य तीन ड्रायव्हर ठेवले आहेत़ - शंकर साळुंके, चालक़
वेळेत पोहोचण्यापेक्षा जीव महत्त्वाचा आहे़ याचे भान सर्वांनी ठेवणे महत्त्वाचे आहे़ वानचालकांना सीटबेल्ट, बे्रकिंग डिस्टन्स, आरशाचे महत्त्व, वेगमर्यादा, गर्दीचे महत्त्व लक्षात यावे़ वाहतूक चिन्हांची ओळख व्हावी़ - आऱ टी़ गिते, परिवहन अधिकारी, लातूर.
बचावात्मक वाहन चालविणे म्हणजेच डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग. प्रथमत: दुसऱ्यांची सोय पाहणे आणि आपली सुरक्षा करणे हा हेतू या संकल्पनेमागे आहे़ या पध्दतीचा व्हीआयपीसह प्रत्येक वाहनचालकाने अवलंब करणे गरजेचे आहे़- डी़ व्ही़ निलेकर, मोटार वाहन निरीक्षक, लातूर.