मास्क न लावलेल्या ग्राहकाला माल देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:04 AM2021-04-02T04:04:36+5:302021-04-02T04:04:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाने आपल्या मागणीचा सकारात्मक विचार करून लॉकडाऊन रद्द केले आहे. आता कोरोना संसर्ग ...

Do not give goods to an unmasked customer | मास्क न लावलेल्या ग्राहकाला माल देऊ नका

मास्क न लावलेल्या ग्राहकाला माल देऊ नका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाने आपल्या मागणीचा सकारात्मक विचार करून लॉकडाऊन रद्द केले आहे. आता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे. मास्क न लावणाऱ्या ग्राहकांना दुकानात प्रवेश नाकाराच शिवाय त्यांना माल देऊ नका, असे आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाने केले आहे.

व्यापारी महासंघाशी संलग्न ७२ व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. ‘लॉकडाऊन, खबरदारी आणि उपाय’ या विषयावर बैठकीत चर्चा झाली. महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, उद्योजक व व्यापाऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन रद्द केले. आता कोरोना संसर्ग बाजारपेठेतून वाढू नये, याची जबाबदारी ग्राहकांबरोबर व्यापाऱ्यांचीही आहे.

दुकानात मालक व प्रत्येक कर्मचाऱ्याला मास्क अनिवार्य करावे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच ग्राहकांना सेवा दिली जावी. विक्री झाली नाही तरी चालेल पण मास्क न लावलेल्या ग्राहकांना वस्तू देऊ नका. सॅनिटायझर वापरण्याची सक्ती करा, थर्मलगनने तपासणी करावी, आदी सूचना त्यांनी केल्या.

गुलमंडी, शहागंज, गजानन मंदिर चौक, सिडको कॅनॉट प्लेस, टीव्ही सेंटर या बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्यासाठी खुद्द महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी फिरून तेथील व्यापाऱ्यांना सूचना द्याव्यात व गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाला मदत करावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

या ऑनलाईन बैठकीला महासंघाचे सचिव लक्ष्मीनारायण राठी, अजय शहा, विजय जैस्वाल, सरदार हरीसिंग, जयंत देवळाणकर, गुलाम हक्कानी, कपडा असोसिएशनचे विनोद लोया, दिलीप चोटलानी, ज्ञानेश्वर खर्डे, बद्रीनाथ ठोंबरे, संतोष कावळे, संजय कांकरिया, मंगल पटेल, जगदीश एरंडे, युसूफ मुकाती, कन्हैयालाल जयस्वाल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट

३० हजार व्यापारी घेणार लस

शहरातील लहान-मोठे ३० हजार व्यापारी, त्यांचे कुटुंबीय व दुकानात काम करणारे कर्मचारी मिळून दीड ते दोन लाख लोक लस घेणार आहेत. त्याचे नियोजन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: Do not give goods to an unmasked customer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.