वडिलांना निर्वाह भत्ता न देणे भोवले !
By Admin | Published: May 2, 2017 11:34 PM2017-05-02T23:34:13+5:302017-05-02T23:38:13+5:30
उस्मानाबाद : तालुक्यातील कसबे तडवळे येथील भिमाजी पाराजी गायकवाड यांनी ‘मुले निर्वाह भत्ता देत नाहीत’, अशी तक्रार उपविभागीय दंडाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली होती.
उस्मानाबाद : तालुक्यातील कसबे तडवळे येथील भिमाजी पाराजी गायकवाड यांनी ‘मुले निर्वाह भत्ता देत नाहीत’, अशी तक्रार उपविभागीय दंडाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली होती. या तक्रारीची तातडीने दखल दोन्ही मुलांना पकडण्याचे वॉरंट बजाविण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी संबंधित दोघांनाही उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. निर्वाह भत्ता देण्याच्या अनुषंगाने लेखी घेतल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
तडवळे येथील भिमाजी गायकवाड यांनी महादेव गायकवाड व कृष्णा गायकवाड ही दोन्ही मुले संभाळत नसल्याने प्रशासनाकडे धाव घेवून निर्वाह भत्ता मिळावा, अशी मागणी केली होती. निर्वाह भत्ता देण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तसे आदेश काढण्यात आले होते. भिमाजी गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार सुरूवातीचे दोन-तीन महिने दोन्ही मुलांनी नियमितपणे निर्वाह भत्ता दिला. परंतु, त्यानंतर भत्ता मिळाला नाही. मुलांकडे वारंवार मागणी करूनही काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे पुन्हा प्रशासनाकडे यावे लागले, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. भिमाजी गायकवाड यांनी आपली व्यथाच उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमोरही मांडली. याची गंभीर दखल घेत संबंधित दोन्ही मुलांना पकडण्याचे वॉरंट काढले. वॉरंटनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश बेंबळी ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले. त्यानुसार सदरील दोन्ही मुलांना मंगळवारी उपविभागीय दंडाधिकारी प्रसाद यांच्यासमोर हजर करण्यात आले. संबंधित दोघांकडूनही मार्च २०१५ ते एप्रिल २०१७ या कालावधीतील सुमारे ३९ हजार रूपये एवढा निवाह भत्ता देण्याच्या अनुषंगाने लेखी घेवून त्यांना सोडून देण्यात आले.(प्रतिनिधी)