तंगड्या ओढणाऱ्यांना संधी नको...
By Admin | Published: August 27, 2014 12:39 AM2014-08-27T00:39:10+5:302014-08-27T00:40:19+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मंगळवारी मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मुलाखती झाल्या.
औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मंगळवारी मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मुलाखती झाल्या. एकमेकांच्या तंगड्या ओढणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीचे तिकीट देऊ नका, अशा तक्रारी काही उमेदवारांनी नेत्यांजवळ केल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. या मुलाखतींचा निकाल ३० आॅगस्टपर्यंत लागण्याची इच्छुकांना अपेक्षा आहे.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री आर.आर. पाटील, खा. सुप्रिया सुळे, माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, युवक काँग्रेसचे उमेश पाटील, नीलेश राऊत आदींच्या उपस्थितीत या मुलाखती झाल्या. औरंगाबाद जिल्ह्यासाठी सुमारे दीड तास वेळ देण्यात आला. नऊ मतदारसंघांतील सर्व इच्छुकांच्या मुलाखती यावेळी झाल्या. अनेक उमेदवारांनी यावेळी एकोप्याने लढल्यास जिल्ह्यात आपल्या जागा वाढू शकतात, असे निदर्शनास आणले, तर काहींनी मागील निवडणुकीत काही कार्यकर्त्यांनी आपल्याच उमेदवारांचे पाय ओढण्याचे काम केले. त्यामुळे पक्षाला दोन जागा गमवाव्या लागल्या, असे मत मांडले. पाय ओढणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी मागणी काही इच्छुकांनी केली. विशेष करून गंगापूर आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघाबाबत ही मते मांडली गेली. उपस्थित असलेले जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे म्हणाले की, मुलाखती अतिशय समंजस वातावरणात पार पडल्या. काल बिहारमधील पोटनिवडणुकीचे वारे आणि कार्यकर्त्यांतील समंजसपणा यामुळे यंदा काँग्रेस आघाडीसाठी वातावरण पोषकच बनले आहे.
फौजिया खान यांची अनुपस्थिती
औरंगाबाद मध्यमधून राज्यमंत्री फौजिया खान इच्छुक असल्याचे काही दिवसांपासून चर्चिले जात होते. मात्र, मंगळवारी झालेल्या मुलाखतीच्या वेळी त्या अनुपस्थित होत्या. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडल्याचे या मतदारसंघातील इच्छुकांना वाटत आहे.
प्रत्येकाला तीन- चार मिनिटे
प्रत्येक इच्छुकाने आपल्या उमेदवारीबाबतचे प्रोफाईल नेत्यांसमोर सादर केले. मतदारसंघाची पार्श्वभूमी, पक्षसंघटनांसाठी केलेले प्रयत्न त्याचबरोबर भविष्यात मतदारसंघात करणार असलेले काम याबाबतची माहिती दिली.
काही उमेदवारांनी ‘दृष्टिक्षेप २०१४’ अशा आशयाचे व्हिजन डॉक्युमेंटही तयार केले होते. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांसाठी दीड तासाची वेळ देण्यात आली. यामध्ये प्रत्येक इच्छुकाच्या वाट्याला तीन ते चार मिनिटे वेळ आला.
औरंगाबाद मध्य मतदारसंघ
विनोद पाटील, अब्दुल कदीर मौलाना, मनमोहनसिंग ओबेरॉय, मुश्ताक अहमद, डॉ. गफ्फार कादरी, कमाल फारुकी, बादशाह पटेल, मेहराज पटेल, मिलिंद पाटील, अफसर खान, लक्ष्मण औताडे, मनोज घोडके, आशाताई धोंड, रंगनाथ काळे, अ. सिकंदर अ. साजेद, सुरजिसिंग खुंगर, जुबेर मोतीवाला.
गंगापूर- खुलताबाद
कृष्णा पाटील डोणगावकर, डॉ. ज्ञानेश्वर नीळ, विलास चव्हाण, राजू वरकड, हरिभाऊ ढवण, संपत छाजेड, अनिलभय्या जाधव, अॅड. कैसरोद्दीन, सूर्यकांत गरड, शेख नासेर, माजी आमदार कैलास पाटील
औरंगाबाद पूर्व
अभिजित देशमुख, सलीम पटेल वाहेगावकर, डॉ. बाळासाहेब पवार, मुश्ताक अहमद, रुख्मिणीबाई शिंदे, विश्वनाथ स्वामी.
औरंगाबाद पश्चिम
विनोद बनकर, शैलेंद्र देहाडे, गाझी सादोद्दीन,
संदीप शिरसाठ, विजय वाहूळ
कन्नड मतदारसंघ
उदयसिंग राजपूत, मारुती राठोड, रंगुबाई पुंडलिक काजे, डॉ. संजय गव्हाणे
पैठण मतदारसंघ
आ. संजय वाघचौरे, तुषार शिसोदे, उदय पवार, अप्पासाहेब निर्मळ, कांतराव औटे,
अनिल जाधव, रंजना कडू पाटील
सिल्लोड मतदारसंघ
सुधाकर पाटील
वैजापूर
भाऊसाहेब पाटील
चिकटगावकर
फुलंब्री मतदारसंघ
नितीन शंकरराव देशमुख, पांडुरंग तांगडे पाटील, अनुराधा चव्हाण, आनंदा ढोके.