‘एक वेळ जेवण नको; पण पाणी द्या...’;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 03:01 PM2019-04-07T15:01:51+5:302019-04-07T15:07:53+5:30

औरंगाबाद महापालिकेला पाझर फुटेना

'Do not have a meal at all; But give it water ... '; | ‘एक वेळ जेवण नको; पण पाणी द्या...’;

‘एक वेळ जेवण नको; पण पाणी द्या...’;

googlenewsNext
ठळक मुद्देपाणी टंचाईने नागरिकांचा संताप 

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : शहराच्या आसपास असलेल्या १८ खेड्यांचा १९९० मध्ये महापालिकेत समावेश करण्यात आला. मागील ३० वर्षांत महापालिका या खेड्यात राहणाऱ्या नागरिकांना पाणीही देऊ शकत नाही. पाण्याअभावी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. ‘एक वेळचे जेवण नाही मिळाले तरी चालेल; पण पिण्यासाठी पाणी द्या...’ अशी मागणी त्रस्त नागरिक करीत आहेत. तरीही महापालिकेला पाझर फुटायला तयार नाही. २०० वसाहतींमध्ये शंभर टँकरद्वारे ६०० फेऱ्या दररोज करण्यात येत असल्याचा दावा मनपाकडून करण्यात येतो. हा दावा निव्वळ फोल असल्याचे समोर येत आहे.

भगतसिंगनगरची अवस्था वाळवंटासारखी
हर्सूल गावाचा अविभाज्य भाग असलेला परिसर म्हणजे वॉर्ड क्र.२, म्हसोबानगर-भगतसिंगनगर होय. २०१५ मध्ये या भागातील नागरिकांनी मोठ्या आशेने शिवसेनेचे बन्सी जाधव यांना निवडून दिले. जाधव यांनी नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. या भागातील जुन्या आणि नवीन वसाहतींना पाणी देण्यासाठी महापालिकेने जलवाहिन्याच टाकलेल्या नाहीत. १८ ते २० नागरिकांनी एकत्र येऊन ग्रुप बनवून मनपाकडे पैसे भरले. त्यानंतरही महापालिका 
त्यांना टँकरद्वारे पाणी द्यायला तयार नाही. या भागातील विंधन विहिरींनाही अजिबात पाणी नाही. उन्हाळ्यात तर सर्वच बोअर आटले आहेत. न्यू हायस्कूल, हर्सूलपासून पुढे छत्रपतीनगर, शिवदत्तनगर, हरिसिद्धीनगर, अशोकनगर आदी अनेक नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत. या भागातील नागरिकांना दररोज  २० रुपयांचा जार खरेदी करून तहान भागवावी लागत आहे. वापरण्यासाठी खाजगी टँकरवर अवलंबून राहावे लागते.  सारा सिद्धी या सोसायटीत तर १०० घरे आहेत. एका अपार्टमेंटमध्ये जवळपास १६ घरे आहेत. याशिवाय रो-हाऊसेस वेगळी आहेत. पूर्वी मनपा टँकरद्वारे पाणी देत होती. आता नागरिकांना २१ हजार रुपये ड्यू भरा, असा आग्रह प्रशासन करीत आहे. आम्ही पाणी घेतलेले नसतानाही पैसे भरा, असे मनपाचे म्हणणे असल्याचे नागरिकांनी सांगितले.

हर्सूलमध्ये दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा
वॉर्ड क्र. १ हर्सूलमधील जुन्या गावात राहणाऱ्या नागरिकांना जायकवाडीचे पाणी मिळते. तब्बल दहा दिवसांनंतर गावात पाणीपुरवठा होतो. दोन वर्षांपूर्वी भाजपचे नगरसेवक पूनम बमणे यांनी जलवाहिनी टाकून घेतली. हर्सूल कारागृहाजवळील टाकीवरून गावाला पाणी मिळते. गावात अनेक नवीन वसाहती तयार झाल्या आहेत. त्या वसाहतींना थेंबभरही पाणी मिळत नाही. फुलेनगर, यासीननगर, फातेमानगर, जहांगीर कॉलनी, हरिसिद्धी माता मंदिर परिसर, डेअरी फार्मच्या पाठीमागील वसाहतींना अजिबात पाणी नाही. पाण्याअभावी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने टँकरने प्रत्येक वसाहतीला किमान तीन दिवसांआड पाणी द्यावे, अशी रास्त मागणी नागरिक करीत आहेत. मनपाचे टँकर कुठे येतात आणि कुठे जातात, हेच माहीत नसल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. उन्हाळ्यात पाणी जास्त लागते. त्यामुळे जार, खाजगी टँकरवर नागरिकांना घामाचा पैसा खर्च करावा लागतो. महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर नागरिक अजिबात समाधानी नाहीत. नागरिकांकडे दुसरा पर्यायही नाही. त्यामुळे जेवढे पाणी मिळत आहे, ते घेणे हाच एक पर्याय आहे. मनपाने पाणीपुरवठ्याच्या वेळाच निश्चित केलेल्या नाहीत. कोणत्या वसाहतीला किती वाजता पाणी येईल याचा नेम नसतो. 

मयूर पार्कच्या काही वसाहती तहानलेल्या
मयूर पार्क वॉर्ड क्र. ७ मध्येही पाण्याची परिस्थिती समाधानकारक नाही. ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होतो, त्यांना कमी दाबाने पाणी देण्यात येते. मारुतीनगर, मयूर  पार्क आदी वसाहतींमध्ये मनपाने जलवाहिन्या टाकल्या आहेत. वॉर्डाच्या बाऊण्ड्रीवर असलेल्या विविध वसाहती आजही तहानलेल्या आहेत. नागरिकांची तहान भागविण्यात उपमहापौर विजय औताडे यांना यश आले नाही. पार्वती कॉलनी व आसपासच्या परिसरात किराणा दुकानांमध्ये पाण्याच्या जारची विक्री होते. नागरिक २० रुपये देऊन दुचाकीवर एक जार घेऊन जातात. रिकामा जार आणून द्यायचा आणि नवीन घेऊन जायचा, अशी पद्धत आहे. पार्वती सोसायटी, शिव कॉलनी येथे जलवाहिन्या टाकलेल्या आहेत; पण पाणी कोठून द्यायचे, असा प्रश्न मनपासमोर आहे. समांतर जलवाहिनीचे वाढीव पाणी आले, तरच नवीन जलवाहिन्यांना जोडणी देण्यात येईल, अशी भूमिका मनपाने घेतली आहे. पाण्यासाठी आणखी किती वर्षे वाट पाहावी, असा संतापजनक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. तहानलेल्या वसाहतींना महापालिका टँकरनेही पाणी देण्यास तयार नाही. मयूर पार्कच्या ज्या वसाहतींना मनपाकडून पाणीपुरवठा करण्यात येतो त्या वसाहतींमध्ये अनेकदा पाणी आल्यावर वीजपुरवठा खंडित होतो. मोठ्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाणीच मिळत नाही. या भागात पाणीपुरवठा कधी चार दिवसांआड, तर कधी सहा दिवसांआड होतो.

वॉर्डातील प्रमुख वसाहती : 
- मयूर पार्क, आॅडिटर सोसायटी, सिद्धेश्वरनगर, राजे संभाजीनगर, म्हस्केवाडी, प्रथमेश सोसायटी, गुरुदत्तनगर,  सुजाता सोसायटी, नाथनगर आदी. लोकसंख्या - 10701 
- हर्सूल गावचा जुना भाग, फुलेनगर, खत्रीनगर, जमनज्योती, यासीननगर, फातेमानगर, जहांगीर कॉलनी.
लोकसंख्या- ११,११७
- भगतसिंगनगर, म्हसोबानगर, हर्सूल गाव, बेरीबागचा काही भाग, साफल्यनगर, घृष्णेश्वर कॉलनी. लोकसंख्या- १०,५३७

Web Title: 'Do not have a meal at all; But give it water ... ';

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.