अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा वेतन देयकात समावेश करू नका, अधीक्षकांच्या आदेशाने खळबळ
By राम शिनगारे | Published: October 11, 2023 07:39 PM2023-10-11T19:39:16+5:302023-10-11T19:40:05+5:30
जिल्ह्यात १५४ शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक, सैनिकी शाळा, अध्यापक विद्यालयातील शिक्षकांची २०२२-२३ च्या संचमान्यतेत मंजूर पदांचेच वेतन ऑक्टोंबर २०२३ च्या वेतन देयकात समाविष्ट करावेत, कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन आहरित करू नये, असे आदेश माध्यमिकचे वेतन अधीक्षक मधुकर आव्हाड यांनी मुख्याध्यापकांना मंगळवारी (दि.१०) दिले. त्यामुळे जिल्ह्यात १५४ शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यभरात ३० सप्टेंबरपर्यंत २०२२-२३ च्या संचमान्यता देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आधारचे प्रमाणिकरण अंतिम मानण्यात आले. त्यानुसार शाळांना संचमान्यता मिळाल्या आहेत. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या आधारे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे अनेक शाळांमधील एक किंवा दोन विद्यार्थी कमी पडल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढली आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अनुदानित शाळांमधील तब्बल १५४ शिक्षक अतिरिक्त ठरले आहे. या शिक्षकांच्या ऑक्टोंबर महिन्यातील पगार वेतन देयकात समाविष्ट करण्यात येऊ नये, असे वेतन अधिक्षकांनी वरिष्ठांच्या सुचनेनुसार मुख्याध्यापकांना आदेश दिले. त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या शिक्षकांनी आमचे समायोजन होईपर्यंत वेतन थांबविण्यात येऊ नये, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
वेतन थांबविण्यात येऊ नये
राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे, प्राथमिकचे एम.एम. खुटे, कार्याध्यक्ष वाहेद शेख, उपाध्यक्ष विलास उमाप, आरेफ शेख यांनी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांची भेट घेत अतिरिक्त शिक्षकांचे वेतन थांबवू नये, अशी मागणी निवेदनद्वारे केली. तेव्हा उपसंचालक साबळे यांनी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची स्वतंत्र यादी संबंधित शाळांनी दिल्यास शिक्षकांचे वेतन करण्यात येईल, असे सांगितले.